शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा – हे केवळ तीन शब्द नाहीत, तर एका क्रांतीची मशाल आहे, जी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पेटवली आणि अनेक पिढ्यांसाठी प्रेरणास्रोत ठरली. कदम कुटुंबीयांच्या तीन पिढ्यांच्या जीवनप्रवासाकडे पाहताना असेच काहीसे जाणवते. ७२ च्या दुष्काळात पोटाची आग विझवण्यासाठी हातात फावडे आणि डोक्यावर मातीचे घमेले घेऊन रोजगार हमिचे काम करणारे हे कुटुंब, आज शिक्षण प्रसाराच्या कार्यात तल्लीन झाले आहे, हे पाहून नियतीलाही आश्चर्य वाटले असेल. ८० च्या दशकात मुळा धरणाचे पाणी परिसरात आले. देडगावच्या मातीने जेव्हा मुळा धरणाच्या पाण्यातून ओलावा घेतला, तेव्हा कदम कुटुंबीयांच्या जीवनालाही पालवी फुटली. मोलमजुरीच्या खडतर जीवनातून त्यांनी शेतीकडे आपला मोर्चा वळवला. उत्तम शेतीच्या बळावर प्रपंच उन्नतीच्या शिखरावर नेला. स्वतः शिक्षणापासून वंचित राहिलेले साहेबराव कदम यांनी शिक्षणाचे महत्त्व जाणले आणि म्हणूनच कुटुंबाला थोडे स्थैर्य प्राप्त झाल्यावर देवी वस्ती येथील जिल्हा परिषदेच्या शाळेसाठी स्वतःच्या जमिनीचा काही भाग त्यांनी दान केला. त्यांची ही कृती म्हणजे ‘तमसो मा ज्योतिर्गमय’ या उक्तीचा साक्षात्कार होता. महात्मा फुले यांचे ते मार्मिक उदगार – ‘विद्ये विना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके सारे अनर्थ एका अविद्येने केले’ – हे कदम कुटुंबीयांच्या पहिल्या पिढीने अक्षरशः अनुभवले. लौकिक अर्थाने अडाणी असलेले मच्छिंद्र, साहेबराव, गोरक्षनाथ व स्वर्गीय बबनराव या चार बंधूंनी शेतीत अपार कष्ट केले. त्यांच्या डोळ्यासमोर एकच स्वप्न होते – आपल्या मुलांना चांगले शिक्षण द्यायचे. त्यांच्या त्यागातून आठ सुशिक्षित तरुणांची एक नवी पिढी उदयाला आली आणि या पिढीने आपले जीवन शिक्षण प्रसाराच्या यज्ञकुंडात समर्पित केले.
साहेबरावांचे कनिष्ठ चिरंजीव विजय कदम! डोळ्यांनी अंध असूनही त्यांनी आपल्या आत्मविश्वास, कठोर परिश्रम आणि जिद्दीच्या बळावर शिक्षणात पीएचडी पर्यंत मजल मारली. आज ते अहमदनगर महाविद्यालयात इतिहास विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. भारतीय उच्च अध्ययन संस्था, राष्ट्रपती निवास, शिमला, हिमाचल प्रदेश येथे ते असोसिएट आहेत. तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे इतिहास अभ्यास मंडळ तसेच दिव्यांग अभ्यास मंडळाचे ते सदस्य म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्यातील ज्ञानज्योत केवळ स्वतःपुरती मर्यादित राहिली नाही. त्यांनी स्वयं प्रेरणेतून देडगावमध्ये तक्षशिला ज्युनिअर कॉलेज व इंग्लिश मीडियम स्कूलची स्थापना केली. आज या ज्ञानमंदिरात सुमारे हजारभर विद्यार्थी शिक्षणाचे अमृत ग्रहण करत आहेत. प्रा. कदम यांच्या या कार्यामुळे परिसरातील गोरगरीब मुलांना शहरांमधील नामांकित शिक्षण संस्थांप्रमाणे गुणवत्तापूर्ण शिक्षण सहज उपलब्ध झाले आहे. हे कार्य म्हणजे ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ या भावनेचा परिपाक आहे. प्रा. विजय कदम यांच्या पत्नी, सौ. शुभांगी या देखील उच्चशिक्षित आहेत. त्याही तक्षशिलाच्या माध्यमातून सदैव शिक्षण प्रसारात रमल्या आहेत. त्या केवळ शिक्षिका नाहीत, तर विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणास्रोत आहेत. प्रा. कदम यांचे ज्येष्ठ बंधू संजय हे कृषी अधिकारी असले तरी शिक्षण प्रसाराच्या कार्यात तेही सक्रिय योगदान देतात. त्यांनी अनेक कृषी शाळांचे आयोजन करून उत्तम शेतीसाठी शेतकऱ्यांना कार्यान्वित केले आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नवनवीन पिकांसाठी शेतकऱ्यांना ते प्रशिक्षित करतात. त्यांची पत्नी, सौ. सुवर्णा, जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. त्या आपल्या सेवेच्या माध्यमातून अनेक दिन दलित समाजातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी दूर करत आल्या आहेत. कोणाला गणवेश घे, कोणाला दप्तर दे, कोणाची आई आजारी आहे म्हणुन जेवणाचा डब्बा दे, अशा मातृवत्सल स्वभावामुळे विद्यार्थ्यांना त्या आपल्या कुटुंब सदस्य वाटतात. त्यांचे कार्य म्हणजे ‘ज्ञानदानाहून श्रेष्ठ दान नाही’ याची प्रचिती आहे.
गोरक्षनाथ यांचे चिरंजीव ज्ञानेश्वर कदम हे मुळा एज्युकेशन सोसायटीच्या अहिल्यादेवी होळकर विद्यालयात ज्ञानदानाचे पवित्र कार्य अविरतपणे करत आहेत. स्वतः विद्यार्थी दशेत असताना अनुभवलेल्या समस्या आपल्या विद्यार्थ्यांच्या वाट्याला येऊ नयेत म्हणून त्यांचा हात मदतीसाठी सतत पुढे असतो. विद्यार्थी प्रिय शिक्षक असा त्यांचा लौकिक कायम टिकून आहे. त्यांचे कनिष्ठ बंधू राजेंद्र हे परिसरातील गोर-गरिबांच्या मुला- मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. मच्छिंद्र यांचे कनिष्ठ चिरंजीव प्रा. जालिंदर कदम हे जिजामाता उच्च माध्यमिक विद्यालयात गेली २० वर्षे अथकपणे ज्ञानदानाचे कार्य करत आहेत. उपक्रमशील व मन मिळाऊ शिक्षक म्हणून त्यांची परिसरात ख्याती आहे. त्यांचे बंधू भाऊसाहेब कदम हे आपल्या मुलांच्या शिक्षणाबद्दल अत्यंत जागरूक आहेत. भाऊसाहेब यांचे चिरंजीव विठ्ठल हे तक्षशिला ज्युनिअर कॉलेज व इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य म्हणून उत्तम प्रकारे जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांनी आपल्या अथक परिश्रमाने तक्षशिलाची शैक्षणिक क्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ते केवळ प्राचार्य नाहीत, तर घरातील कर्त्या पुरुषाप्रमाणे शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याची काळजी घेणारे ते सर उदय पालक आहेत.
बबनराव कदम यांचे चिरंजीव दत्तात्रय व आदिनाथ हे जरी शेती व्यवसायात रमलेले असले, तरी ऊसतोडणी कामगारांची मुले शाळेत जावीत, मेंढपाळ समाजातील गरीब मुले शिकून त्यांनी नोकरी करावी, यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात. त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेक ऊस तोडणी मजुरांची मुले साखर शाळेमध्ये दाखल झाली आहेत. त्यांचे हे प्रयत्न म्हणजे ‘सर्वे भवन्तु सुखिनः’ या उदात्त भावनेचे प्रतीक आहे.
कदम कुटुंबीयांचा हा शिक्षणप्रसाराचा वसा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे अखंडपणे चालत आहे. गरिबी आणि अडचणींवर मात करून शिक्षणाच्या माध्यमातून समाजाला सक्षम करण्याची त्यांची ही जिद्द निश्चितच प्रेरणादायी आहे. त्यांचे हे कार्य केवळ एका कुटुंबापुरते मर्यादित नाही, तर एका समाजाच्या प्रगतीचा मार्ग प्रशस्त करणारे आहे. इच्छाशक्ती आणि सामूहिक प्रयत्नांच्या बळावर कोणतीही परिस्थिती बदलता येते आणि शिक्षणाच्या माध्यमातून एक उज्ज्वल भविष्य साकारता येते. हे या कुटुंबाने दाखवून दिले आहे. कदम कुटुंबातील तिसरी पिढीही मागे नाही. ज्ञानेश्वर यांचा मुलगा अविनाश एम एस सी ऍग्री पर्यंत शिकलेला आहे व सध्या कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहे. ज्ञानेश्वर यांची कन्या आकांक्षा डॉक्टर आहे, ती सध्या रुग्णसेवेत व्यस्त असते. संजय यांचा मुलगा सुयश बी टेक करत आहे व आधुनिक तंत्रज्ञानाचा समाज हितासाठी उपयोग व्हावा, असा त्याचा मानस आहे. कदम कुटुंबीयांचा हा प्रवास म्हणजे ‘कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन’ या भगवतगीतेतील वचनाचा जिवंत वस्तूपाठ आहे.