बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील भूमिपुत्र प्रदीप लालबहादुर कोकरे यांचे 5 मे रोजी लग्न झाले.लग्नानंतर घरी येत नाही तोच आर्मी डिपार्टमेंट मधून त्यांना फोन आला की पुढील सुट्ट्या रद्द होऊन तातडीने रवाना व्हावे लागेल. प्रदीप मेजर यांनी कसलाही विचार न करता देशसेवेला प्रथम प्राधान्य देत भूमातेच्या रक्षणासाठी जाण्याचा निर्णय घेतला व 7 मे रोजी ते देशसेवेसाठी रवाना झाले.
मेजर प्रदीप कोकरे हे राजस्थानमध्ये सुरतगड येथे आर्मीमध्ये गणर विभागिय कार्यरत असून आत्ताच काही दिवसापूर्वी काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यामध्ये काही भारतीयांचा मृत्यू झाला व भारत पाकिस्तान सीमेवर तणावग्रस्त वातावरण निर्माण झाले. म्हणूनच सर्व मेजर जवानांच्या सुट्ट्या थांबवून त्यांना ताबडतोब देशसेवेसाठी बोलावण्यात आले. मेजर प्रदीप कोकरे यांनी देशसेवेला प्रथम प्राधान्य देत भूमातेच्या रक्षणासाठी देशसेवेला जाण्याचा निर्णय घेतल्याने संपूर्ण कोकरे परिवार व देडगाव परिसर यांना सार्थ अभिमान आहे. त्यांच्या पत्नी अमृता कोकरे, वडील लालबहादुर कोकरे व आई रत्नमाला कोकरे, भावजय प्रतिभा कोकरे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.
मेजर प्रदीप कोकरे देश सेवेसाठी रवाना होतेवेळी त्यांचे चुलते हरिभाऊ कोकरे, बंधू संदीप कोकरे, राहुल कोकरे, सतीश कोकरे ,शंकर कोकरे, संजय कोकरे, निलेश कोकरे व मेहुणे तेजस चोरमले व संपूर्ण कोकरे परिवार उपस्थित होता. भारत माता की जय, जय जवान जय किसान या घोषणा देत तो देश सेवेसाठी रवाना झाला.
