बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा, देडगाव येथे शाळा प्रवेशोत्सवाचा भव्य व प्रेरणादायी कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला. याप्रसंगी गावातील ज्येष्ठ नागरिक, शिक्षणप्रेमी पालक, स्थानिक मान्यवर आणि ग्रामस्थ बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कारभारी मुंगसे उपस्थिती लाभली. माजी सरपंच दत्ता पाटील मुंगसे, विलास मुंगसे, निलेश कोकरे, गोरक्षनाथ नांगरे गुरुजी, ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके, पत्रकार इन्नुसभाई पठाण, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रशांत ससाणे, उपाध्यक्ष कविता आबासाहेब बनसोडे, सदस्य दिलदार सय्यद, युवा कार्यकर्ते व समिती सदस्य मच्छिंद्र मुंगसे आदी मान्यवर उपस्थित होते. ग्रामपंचायततर्फे उपसरपंच बाळासाहेब मुंगसे यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या व पालकांना शिक्षणाबद्दलची जागृती वाढवण्याचे आवाहन केले. यावेळी गोरक्षनाथ नांगरे गुरुजींनी आपल्या नातवाच्या वाढदिवसानिमित्त सर्व विद्यार्थ्यांना पेन, वही आणि बिस्किट वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली. या शाळा प्रवेशोत्सवाच्या माध्यमातून नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले व त्यांना शिक्षणाची गोडी लागावी यासाठी शिक्षकवृंदांनी विविध उपक्रम राबवले. कार्यक्रम संपूर्णपणे शिस्तबद्ध, प्रेरणादायी वातावरणात पार पडला. या उपक्रमामुळे गाव – शाळा – पालक यांच्यातील नाते आणखी दृढ झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बथुवेल हिवाळे सर आणि दत्तात्रय धामणे सर यांनी केले. ज्येष्ठ आदर्श शिक्षक भाऊसाहेब सावंत सर यांनी आपल्या मनोगतातून शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्रीमती कविता करांडे, श्रीमती सुवर्णा जाधव आणि श्रीमती अश्विनी कदम यांनी विशेष सहभाग नोंदवून परिश्रमपूर्वक कार्य केले. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी मुख्याध्यापक सतिशकुमार भोसले यांनी सर्व उपस्थितांचे मनःपूर्वक आभार मानले.