शेती रस्त्यासाठी देडगाव तलाठी कार्यालयासमोर शेतकऱ्याचे तीन दिवसांपासून उपोषण

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील शेतकरी संतोष भाऊराव टांगळ यांनी शेती रस्त्यासाठी देडगाव तलाठी कार्यालयासमोर उपोषण सुरु केले आहे. गट नंबर ५८३, ५८४ येथील जमिनीत जाण्यासाठी या शेतकऱ्याला रस्ता नसल्याने पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतात मशागतीसाठी साधने जाण्यासाठी तसेच खते, बियाणे वहिवाट यासाठी संतोष टांगळ यांचे आतोनात हाल होत आहेत.
या त्रासामुळे संतोष टांगळ हे गेल्या तीन दिवसांपासून तलाठी कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत. यापूर्वीही संतोष टांगळ यांनी याच प्रश्नावर पाठपुरावा केला होता. त्यांना अनेकदा आश्वासन दिले गेले, परंतु त्या आश्वासनांची पूर्तता न झाल्याने संतोष टांगळ हे पुन्हा एकदा उपोषणाला बसलेले आहेत.
उद्या शेतकऱ्यांचा सर्वात मोठा सण बैलपोळा तोंडावर असताना या शेतकऱ्यावर आपले मुलंबाळ, प्रपंच सोडून आपले बलिदान करण्याची वेळ आली आहे. काल नायब तहसीलदार चिंतामणी रावसाहेब यांनी उपोषस्थळी भेट दिली. मात्र, समाधानकारक उत्तर न मिळाल्याने संतोष टांगळ हे उपोषणावर ठाम आहेत. आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे, त्यामुळे शेतकऱ्यांमधून संतप्त भावना व्यक्त होत आहे.