तहसीलदारांच्या आश्वासनानंतर देडगाव येथील शेतकऱ्याचे उपोषण सुटले

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील शेतकरी संतोष भाऊराव टांगळ गेल्या चार दिवसापासून देडगाव येथील तलाठी कार्यालयासमोर उपोषणास बसले होते. त्यांना त्यांच्या गट नंबर ५८३,५८४ या शेतामध्ये जाण्यासाठी रस्ता नसल्याने उपोषणाची वेळ आली होती.अखेर आज नेवासा तहसीलदार संजय बिराजदार यांनी प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन पाहणी केली असता शेतकऱ्याच्या अडचणी समजून घेतल्या. प्रशासकीय कायद्यानुसार येत्या चार ते पाच दिवसांमध्ये निकाल बजावू असे लेखी आश्वासन संतोष टांगळ यांना दिल्यामुळे संतोष टांगळ यांनी प्रशासनाला सहकार्य करत रस्त्याच्या मागणीसाठी असलेले उपोषण मागे घेतले.

यावेळी सरपंच चंद्रकांत मुंगसे यांनी तहसीलदार संजय बिराजदार यांच्या या निर्णयाचे स्वागत करत त्यांचे ग्रामस्थाच्या वतीने अभिनंदन केले. तसेच गावातील असेच सहा ते सात बंद झालेले रस्ते खुले करावे, अशी मागणी केली. यावेळी बालाजी देवस्थानचे अध्यक्ष नवनाथ मुंगसे, बळीराज्य संघटनेचे अध्यक्ष मच्छिंद्र मुंगसे ,भाजप तालुका उपाध्यक्ष आकाश चेडे, गणपती विश्वस्त अशोक मुंगसे, पत्रकार युनूस पठाण ,दादा पळसकर , भारत औटी, सदानंद साळवे, अर्जुन घोडके, देविदास मुंगसे , दिलदार सय्यद, पप्पू चेडे, संजय देवकाते, नायब तहसीलदार शिरीष कुलकर्णी, देडगाव मंडलाधिकारी सुनील खंडागळे, तलाठी जाधव भाऊसाहेब, ग्रामपंचायत कर्मचारी बाळासाहेब म्हस्के, फकीरचंद हिवाळे, अविनाश हिवाळे आदी उपस्थित होते.