बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे महाशिवरात्रीनिमित्त यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून दोन दिवस विविध कार्यक्रम होणार आहेत. यामध्ये महाशिवरात्रीनिमित्त रविवारी (ता.१५) सकाळी ७ ते ११ शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण होणार आहे. सकाळी ८ वाजता कावडीच्या पाण्याने जलाभिषेक करण्यात येणार आहे. तर ११ ते ४ संगीत भजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ४ ते ७ ग्रंथ दिंडी व रथाची मिरवणूक होणार आहे. रात्री ८ ते १० हभप प्रवीण महाराज गोसावी यांची कीर्तनसेवा होणार आहे. महाशिवरात्रीनिमित्त येणाऱ्या भाविकांसाठी दिवसभर फराळाच्या महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी सोमवारी (ता.१६) सकाळी ९ ते ११ हभप एकनाथ महाराज चत्तर शास्त्री ( परभणीकर) यांचे काल्याचे कीर्तन व नंतर महाप्रसाद होणार आहे. तसेच दुपारी ४ वाजता जंगी कुस्त्याचा हगामा होणार आहे. तरी या उत्सवाचा जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कैलासनाथ मित्र मंडळ, समस्त ग्रामस्थ व भजनी मंडळ देडगाव यांनी केले आहे.


