घोडेगाव येथे होणार अतिरिक्त तहसील कार्यालय; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

आपला जिल्हा

जनशक्ती (वृत्तसेवा)- राज्याची वाढती लोकसंख्या आणि शहरांचा होत असलेला भौगोलिक विस्तार यामुळे महसूल विभागाच्या कामकाजाचा व्याप वाढत चालला आहे. हे लक्षात घेऊन राज्यातील सहा महसूल विभागात ११ अतिरिक्त जिल्हाधिकारी तर ६९ अतिरिक्त तहसीलदार कार्यालयांची नव्याने निर्मिती करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. त्यामुळे आता अहिल्यानगर जिल्ह्यात नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे अकोले तालुक्यातील राजूर येथे अतिरिक्त तहसील कार्यालय होणार आहे.जिल्हा प्रशासनातील कामकाजाचा वाढता व्याप, सामान्य नागरिकांना होणारा त्रास, जिल्ह्यांचा व तालुक्यांचा भौगोलिक व्याप, वाढती लोकसंख्या आणि त्यानुसार अतिरिक्त जिल्हाधिकारी व अतिरिक्त तहसीलदार कार्यालय निर्मितीची गरज होती. नव्याने अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयांची निर्मितीसाठी त्यात येणारी तालुक्यांची संख्या, या कार्यालय निर्मितीच्या अनुषंगाने असणारी लोकसंख्या, भौगोलिक क्षेत्रफळ, आदिवासी, तसेच दुर्गम क्षेत्र लोकसंख्या असलेल्या तालुक्यांची संख्या, जिल्हा मुख्यालयापासून प्रस्तावित कार्यालयाचे अंतर, तालुक्यातील सर्वात दूरच्या गावांचे सध्याच्या मुख्यालयापासूनचे अंतर, प्रस्तावित कार्यालय स्थापन झाल्यास येणारे अंतर, जिल्ह्याची लोकसंख्या, क्षेत्रफळ विचारात घेण्यात आले आहे.