नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; सरपंच चंद्रकांत मुंगसे यांची मागणी

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- मागील काही दिवसांपासून होत असलेल्या अवकाळी पावसामुळे नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव व परिसरातील शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यामुळे शेतकरी संकटात सापडले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळाडवी, अशी मागणी बालाजी देडगावचे सरपंच चंद्रकांत मुंगसे यांनी केली.
नेवासा तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक ठिकाणी उभे पीक, फळबागा तसेच साठवलेला शेतीमाल पूर्णपणे बाधित झाला आहे. या अवकाळी पावसाने कांदा पिकाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. काही कांदा काढण्याच्या अवस्थेत आला आहे तर काही कांदा काढून शेतीत साठवून ठेवला आहे. या दोन्ही कांद्याचे या पावसामुळे मोठे नुकसान होत आहे. अचानक आलेल्या या नैसर्गिक संकटामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश संबंधित प्रशासनाला द्यावेत, तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी होत आहे. यासोबतच मदत वाटप प्रक्रिया जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने राबवून प्रत्येक पात्र शेतकऱ्यापर्यंत मदत पोहोचवावी, जेणेकरून शेतकऱ्यांना या संकटातून सावरण्यास मोठा दिलासा मिळेल, अशी मागणी सरपंच मुंगसे यांनी केली आहे.