बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे श्री संत सावता युवा प्रतिष्ठानच्या वतीने तांबे वस्ती येथील संत शिरोमणी सावता महाराज मंदिर येथे क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात महात्मा फुले, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज, बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून द्वीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी ‘महात्मा फुले यांचा विजय असो’ आणि ‘जय जोति, जय क्रांती’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके यांनी भुषवले. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक आविनाश तांबे यांनी करत प्रमुख मान्यवरांचे स्वागत केले.
तर पोपट बनसोडे, युवा नेते निलेश कोकरे, सरपंच चंद्रकांत मुंगसे, युवा नेते संभाजी लोंढे, अहिल्याबाई होळकर शाळेचे मुख्याध्यापक स्वरूपचंद गायकवाड यांनी आपल्या मनोगतातून महात्मा फुले यांच्या ‘शेतकऱ्याचा आसूड’ आणि ‘गुलामगिरी’ या पुस्तकातील व त्यांच्या जीवनावर विचार व्यासपीठावर मांडले.
विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली. हा मूलमंत्र देणाऱ्या महात्म्याचे विचार आजही तितकेच सुसंगत आहेत. युवकांनी शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःची आणि समाजाची प्रगती साधावी. महापुरुष डोक्यावर नाही तर त्यांचे विचार डोक्यात रुजवावे व कोणत्या जातीत महापुरुषांना वाटून घेऊ नये.
या सर्व महापुरुषांचे एक वैचारिक नाते आहे,ज्या काळात स्रियांना फक्त चुल आणि मूल इथपर्यंत सिमित ठेवण्याचे काम इथल्या व्यवस्थेने केले होते त्या काळात स्वतःच्या पत्नीला शिकवून बहुजन सामाज्यातील मुलींनां शिक्षणाची दारे खुले करण्याचे महान कार्य महात्मा फुलेंनी केले,त्यांच्या विचारांची समाजाला खरी गरज असल्याचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष अभिजित ससाणे यांनी आपल्या मनोगतात मांडले.
जयंतीनिमित्त गौरव खंडेराव तांबे या विद्यार्थ्यांची एमबीबीएस च्या शिक्षणासाठी निवड झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला नूतन केंद्रप्रमुख भास्कर तांबे साहेब, बळीराज्य संघटनेचे अध्यक्ष मच्छिंद्र मुंगसे, वंचित बहुजन आघाडीचे बलभीम सकट,अशोक तांबे, बंडू तांबे, दक्ष पोलीस मित्र संस्थेचे शहादेव मुंगसे, परिसरातील ज्येष्ठ नागरिक, महिला मंडळ आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार युनूस पठाण यांनी केले, तर आभार प्रदर्शन निवृत्ती तांबे यांनी केले. स्नेह भोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
हा जयंती सोहळा यशस्वीरित्या पार पडण्यासाठी श्री संत सावता युवा प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांनी अनमोल सहकार्य करत विशेष कष्ट घेतले.

