बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- माणसांवर प्रेम करणारी संस्कृती जपणे आणि परस्परांचे दुःख समजून घेणारी पिढी घडवणे ही काळाची गरज आहे. शिक्षण हे केवळ पदव्या मिळवण्याचे साधन नसून ते सुजान नागरीक घडवण्याचे प्रभावी माध्यम आहे, असे प्रतिपादन सावली प्रतिष्ठानचे संचालक नितेश बनसोडे यांनी केले.
देडगाव येथील मन्वंतर शिक्षण संस्थेच्या तक्षशिला जुनिअर कॉलेज व इंग्लिश मीडियम स्कूलचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ नुकताच उत्साहात पार पडला, यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बनसोडे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष प्रो. डॉ. विजय कदम होते. याप्रसंगी ज्येष्ठ उद्योजक अनिल कोतकर, विक्रीकर सहाय्यक तेजस्विनी कोतकर, कृषी अधिकारी संजय कदम, सरपंच चंद्रकांत मुंगसे, राजेंद्र कदम आदी मान्यवरांची भाषणे झाली.
प्रमुख पाहुण्या तेजस्विनी कोतकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “विवाहानंतरही जर पती आणि कुटुंबाचे भक्कम पाठबळ मिळाले, तर महिला उच्च पदस्थ अधिकारी बनू शकतात, याचे मी स्वतः उदाहरण आहे.” प्रत्येक कुटुंबाने स्त्रियांच्या प्रगतीसाठी त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
अध्यक्षीय भाषणात डॉ. विजय कदम यांनी संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेतला. ते म्हणाले की, “परिसरातून केवळ पदवीधर नव्हे, तर आदर्श अधिकारी, शिक्षक, न्यायाधीश उद्योद्योजक आणि प्रगतशील शेतकरी घडवण्याचा आमचा मानस आहे. याच उद्देशाने आगामी काळात ‘तक्षशिला गुरुकुल’ सुरू करण्यात येणार आहे.” प्राचार्य ज्ञानदेव गोरक्षनाथ कदम यांचा त्यांच्या प्रदीर्घ सेवेबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. तसेच देडगाव केंद्र शाळेचे केंद्रप्रमुख म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल भास्कर तांबे यांचा गौरव करण्यात आला. वर्षभरात शैक्षणिक व सहशालेय उपक्रमांत प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्राचार्य विठ्ठल कदम, उपप्राचार्य संदीप खाटीक, उपप्राचार्या मयुरी पवार, समन्वयक कल्पना पवार, संचालिका शुभांगी कदम व सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. यावेळी उपसरपंच बाळासाहेब मुंगसे, अविनाश कदम, शोभाताई कदम उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन साक्षी गायकवाड व श्रुतीका उगले यांनी केले तर आभार प्राचार्य विठ्ठल कदम यांनी मानले.
‘पसाभर धान्य’ उपक्रम
तक्षशिलाच्या विद्यार्थ्यांनी सामाजिक भान जपत ‘पसाभर धान्य’ उपक्रमांतर्गत ‘सावली’ अनाथ आश्रमासाठी १० पोते धान्य संकलित करून दिले. या मदतीबद्दल नितेश बनसोडे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तसेच प्राचार्य ज्ञानदेव कदम व अनिल कोतकर यांनीही संस्थेला आर्थिक मदत सुपूर्द केली.

