जनशक्ती (वृत्तसेवा)- अहिल्यानगर शहरातील महापालिका निवडणुकीच्या प्रचारात आज एक वेगळाच उत्साह पाहायला मिळाला. जागतिक कीर्तीचे कुस्तीपटू द ग्रेट खली यांच्या आगमनामुळे प्रचाराला मोठे बळ मिळाले. सकाळी ११ वाजता नगरमध्ये दाखल झाल्यानंतर खली यांनी सर्वप्रथम विशाल गणपतीचे दर्शन घेतले.
गणपती दर्शनानंतर गणपती मंदिर ते दिल्ली गेट या मार्गावर भव्य प्रचार रॅली काढण्यात आली. रॅलीदरम्यान द ग्रेट खली यांनी रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या नागरिकांशी संवाद साधला. त्यांच्या साध्या आणि प्रेरणादायी शब्दांना नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. रॅलीमुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
यावेळी बोलताना द ग्रेट खली यांनी स्पष्ट भूमिका मांडली. सध्या अहिल्यानगर शहराची हवा ही भाजप–राष्ट्रवादी युतीच्या बाजूने एकतर्फी दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले. सक्षम नेतृत्व आणि विकासाभिमुख विचारांच्या जोरावर शहराचा सर्वांगीण विकास साधता येईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.यावेळी द ग्रेट खली यांनी युवकांना उद्देशून नियमित व्यायामाचे महत्त्व अधोरेखित केले. युवक शारीरिकदृष्ट्या सक्षम राहिले तर देशही सक्षम होईल. भारताला विश्वगुरू बनवायचे असेल तर आरोग्य आणि शिस्त या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत,” असे त्यांनी सांगितले.


