एका प्रामाणिक, जिद्दी आणि एका आदर्श शिक्षकाच्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने त्यांच्या कष्टाला आणि निष्ठेला सलाम

आपला जिल्हा

भाऊसाहेब कचरू सावंत सर हे आपल्या ३५ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर नियत वयोमानानुसार काही दिवसांत सेवानिवृत्त होत आहेत. या एकूण ३५ वर्षांच्या कालखंडात अनुभवास आले की सरांच्या पायात मर्यादा होत्या, पण त्यांच्या कर्तृत्वाचे पंख इतके बळकट होते की त्यांनी हजारो विद्यार्थ्यांना यशाच्या शिखरावर पोहोचवले. जन्मापासून शरीराने साथ दिली नाही तरी, ज्यांनी मनाच्या उभारीने ज्ञानाची गंगा अखंड वाहत ठेवली, अशा ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाचा आज निरोप घेताना मन भरून येतं आहे.
भाऊसाहेब कचरू सावंत सरांचा जन्म १ जून १९६८ रोजी पाथर्डी तालुक्यातील जोहारवाडी येथे एका सामान्य कुटुंबात झाला.वडीलांचे नाव कचरूभाऊ सावंत व आईचे नाव जानकाबाई सावंत. लहानपणापासूनच जिद्द , मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर प्राथमिक , माध्यमिक शिक्षण पुर्ण करून शिक्षणशास्त्र पदविका अभ्यासक्रम पुर्ण केला आणि १३ सप्टेंबर १९९१ रोजी प्राथमिक शिक्षक पदाच्या सेवेचा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जेऊर हैबती येथे श्रीगणेशा सुरू केला. लहानपणापासूनच प्रामाणिकपणा हा ज्यांचा दागिना आणि शिक्षण हेच ज्यांचे व्रत होते.
​”त्यांच्या पावलांचा आवाज कदाचित हळू असेल, पण त्यांनी विद्यार्थ्यांच्या आयुष्यावर उमटवलेले ठसे कधीही पुसले जाणार नाहीत.” ​”लोकांनी नेहमी त्यांची मर्यादा पाहिली, पण त्यांनी मात्र नेहमी विद्यार्थ्यांची प्रगती पाहिली. अशा जिद्दी शिक्षकाला आमचा मानाचा मुजरा!”
१४ मे १९९३ रोजी सविता ताई यांच्याशी त्यांचा विवाह झाला.सविताताईंनी देखील विवाहापासून ते आजपर्यंत भाऊसाहेब सावंत सरांना प्रेमाची आणि मोलाची साथ दिली.पुढे दोघा उभयतांच्या पोटी राहुल व शीतल ही दोन अपत्ये जन्माला आली.
​”आज निवृत्त होत आहेत ते केवळ एक शिक्षक नाही, तर संघर्षाचा एक जिवंत इतिहास आज विश्रांती घेत आहे.”
​”भाऊसाहेब सावंत सरांची सेवा संपली असेल, पण सरांनी दिलेली शिकवण ३५ वर्षांच्या कालखंडातील शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या रक्तात कायम राहील. सरांची ही ‘अपंगत्वावर मात करण्याची जिद्द’ आम्हा सर्वांसाठी आयुष्यभराची शिदोरी आहे.”
भाऊसाहेब सावंत सरांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जेऊर हैबती सेवेची २५ वर्षे अत्यंत प्रामाणिकपणे सेवा केली. त्यानंतरची ७ वर्ष जिल्हा परिषद प्राथमिक पाचुंदा येथे कधी गेली हे त्यांच्या देखील लक्षात आले नाही .कारण पाचुंदा गावाने देखील त्यांना भरभरून प्रेम दिले.शेवटची ३ वर्षे मामाच्या गावी म्हणजे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देडगाव येथे सेवा करण्याची संधी त्यांना परमेश्वराने दिली.लहानपणी ज्या मातीत भविष्याचे स्वप्न सुरू झाले होते तिथेच सेवेचा शेवटचा अध्याय सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेला.
२०१९ ते २०२२ या काळात कोरोनाने शाळांची घरं हिरावली असतील, पण शिक्षकांनी घरांच्या शाळा केल्या. आज आपण सुरक्षित आहोत आणि शिकत आहोत, याचं मोठं श्रेय त्या पडद्यामागच्या खऱ्या नायकांना जातं. त्यातील एक नायक नाही तर महानायक आहेत भाऊसाहेब कचरू सावंत सर.
ज्यांनी रक्ताचं पाणी करून आणि तंत्रज्ञानाशी झुंज देऊन ज्ञानाची ज्योत संपूर्ण कोरोनाकाळात तेवती ठेवली.

​३५ वर्षे! हा केवळ एक आकडा नाही, तर ही एक ‘तपश्चर्या’ आहे. सर जेव्हा १३ सप्टेंबर १९९१ रोजी या क्षेत्रात रुजू झाले , तेव्हाचे जग वेगळे होते आणि आजचे वेगळे आहे. पण या बदलत्या काळात एक गोष्ट मात्र स्थिर राहिली, ती म्हणजे यांची विद्यार्थ्यांप्रती असलेली निष्ठा. एका पिढीला घडवून दुसरी पिढी हाताळताना, त्यांनी केवळ पुस्तकी ज्ञान दिले नाही, तर संस्कारांचे बाळकडू पाजले. आजही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जेऊर हैबती ,पाचुंदा आणि देडगाव शाळेच्या भिंतीही साक्ष देतील की, किती प्रेमाने आणि हक्काने इथल्या विद्यार्थ्यांना घडवले आहे.
​”शरिराच्या थकव्यापेक्षा ज्यांची कर्तव्यनिष्ठा नेहमी मोठी राहिली, अशा एका आदर्श पर्वाचा आज सेवापुर्तीच्या निमित्ताने सन्मानपूर्वक समारोप होत आहे.”
​ निसर्गाने सरांना शारीरिकदृष्ट्या काही मर्यादा दिल्या, पण सरांनी त्या मर्यादांचे कधीच भांडवल केले नाही. उलट, त्यांनी आपल्या बौद्धिक आणि नैतिक उंचीने त्या मर्यादांना खूप मागे टाकले. पाय थकले तरी त्यांचे विचार कधीच थकले नाहीत. शाळेच्या पायऱ्या चढताना होणारा त्रास त्यांनी कधीही कामात आड येऊ दिला नाही, हाच त्यांचा सर्वात मोठा विजय आहे. सरांनी आपल्या अपंगत्वावर मात करत, पाऊस असो वा ऊन, आपली कर्तव्यनिष्ठा ढळू दिली नाही. त्यांची ही ‘प्रामाणिक सेवा*’ सर्व शिक्षकांसाठी एक आदर्श वस्तुपाठ आहे.
बालपण मामाच्या गावी गेलं , आणि शिक्षणही मामांनी केलं. स्व. विठ्ठल मामा मुंगसे, स्व. हरीमामा मुंगसे तसेच सौ. वच्छला मावशी यांनी बालपणी खूप प्रेम आणि संस्कार दिले. ज्या शाळेत इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत शिक्षण घेतले , त्याच शाळेत शिक्षक म्हणून सेवानिवृत्त होत आहेत.
भाऊसाहेब सावंत सरांनी विद्यार्थ्यांना केवळ धडे शिकवले नाहीत, तर त्यांनी स्वतःच्या आयुष्यातून तुम्हाला ‘कधीही हार न मानण्याची’ वृत्ती शिकवली आहे. भविष्यात जेव्हा जेव्हा विद्यार्थ्यांना वाटेल की परिस्थिती कठीण आहे, तेव्हा तेव्हा सरांचा तो जिद्दी चेहरा डोळ्यांसमोर येईल आणि आपोआपच मार्ग सापडेल.
​ भाऊसाहेब कचरू सावंत यांची निवृत्ती म्हणजे एका युगाचा अंत नाही, तर एका शांत आणि समाधानी प्रवासाची सुरुवात आहे. तुम्ही या मातीला दिलेले योगदान सुवर्ण अक्षरात कोरले जाईल.
​शेवटी एवढेच म्हणतो:
“शरीर थकले तरी मन ज्यांचे उभारी देत राहिले,
अशक्य गोष्टींना ज्यांनी शक्य करून पाहिले…
नसे मोह ज्यांना कीर्तीचा, नसे सोस संपत्तीचा,
असा हा आमचा शिक्षक, आदर्श होता माणुसकीचा!”
​सर, तुम्हाला पुढील दीर्घ आणि आरोग्यदायी आयुष्यासाठी मनापासून शुभेच्छा!