बालाजी देडगाव ( प्रतिनिधी)- समाजातील जातीभेद दूर होऊन हिंदू समाज संघटित व्हावा आणि देव देश धर्मासाठी कार्यरत व्हावा, या मुख्य उद्देशाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी निमित्त देडगाव येथे झालेल्या हिंदू संमेलनास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून तारकेश्वर गडाचे महंत गुरुवर्य आदिनाथ महाराज शास्त्री होते. त्यासोबत प्रमुख वक्ते म्हणून जिल्हा कार्यवाह दीपक जोंधळे सर होते. व्यासपीठावर हभप सुखदेव महाराज मुंगसे व हभप मतकर महाराज उपस्थित होते.
हिंदू संमेलनाचे सूत्रसंचालन समितीचे सदस्य अमोलजी अंबाडे यांनी केले. तसेच नेवासा तालुका कार्यवाह सुनील सावंत हे देखील उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना हिंदू संमेलन समितीचे सदस्य अरुण वांढेकर यांनी केली. त्यांनी सांगितले की या हिंदू संमेलनाच्या पूर्वतयारीच्या प्रक्रियेत देडगाव व परिसरातील गावांमध्ये अभूतपूर्व जनजागृती राबविण्यात आली.
यामध्ये आठ गावातील सुमारे २४२३ हिंदू घरामध्ये गृहसंवाद अभियान राबवण्यात आले. या अभियानामध्ये २५ कार्यकर्ते सहभागी होते. यावेळी देडगाव व देडगाव परिसरातील हजारोच्या संख्येने हिंदू माता-भगिनी पुरुष बांधव उपस्थित होते. यावेळी जिल्हा कार्यवाहक दीपक जोंधळे म्हणाले, संघाने यापुढे पंचपरिवर्तनाचे मुद्दे घेऊन समाजामध्ये काम करायचे ठरवले आहे.
कुटुंब प्रबोधन, सामाजिक समरसता, पर्यावरण, स्व बोध,नागरिक शिष्टाचार या पंच परिवर्तनातून समाजाचे परिवर्तन होईल. समाज परिवर्तित झाला की राष्ट्र आपोआप प्रबळ व शक्तिशाली बनेल. हिंदू समाजाने सर्व भेदभाव विसरून देव देश व धर्माच्या उन्नतीसाठी एकत्र या, गो सेवेच्या माध्यमातून देशी गायीचे संगोपन व संवर्धन करा देश सेवेसाठी नेहमी संत समाजाच्या सोबत आहे, असे प्रतिपादन आदिनाथ महाराज शास्त्री यांनी यावेळी केले.
यावेळी बालाजी देडगाव व परिसरातील हिंदू बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


