पाचुंदा येथे पीर साहेब यात्रेची जंगी कुस्त्यांच्या हगाम्याने सांगता; मल्लांच्या चित्तथरारक लढतींनी कुस्तीशौकीन मंत्रमुग्ध

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी): नेवासा तालुक्यातील पाचुंदा येथील ग्रामदैवत हजरत पीर साहेब यांच्या वार्षिक यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य निकाली कुस्त्यांच्या हगाम्याने यात्रेची अत्यंत उत्साहात सांगता झाली. या हगाम्यात राज्यभरातून आलेल्या नामांकित मल्लांनी आपल्या कौशल्याचे प्रदर्शन घडवत कुस्तीशौकिनांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.
हजरत पीर साहेब यात्रेनिमित्त ग्रामस्थांनी गंगा नदी वरून कावडीने पाणी आणून पीर साहेब ला स्नान घालण्यात आले. दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. जंगी हजऱ्याचेही आयोजन करण्यात आले होते. यात्रेमध्ये लहान मुलांच्या खेळण्या, मेव्याचे दुकाने, संसारा उपयोगी वस्तू चे दुकाने असे अनेक दुकाने थाटली गेली होती. यात्रेच्या शेवटच्या दिवशी आयोजित कुस्त्यांचा हगामा हे मुख्य आकर्षण ठरले. दुपारी ग्रामपंचायत आणि यात्रा कमिटीच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते कुस्तीच्या मैदानाला प्रारंभ करण्यात आला. मैदानात लहान गटापासून ते मोठ्या गटापर्यंत अनेक चुरशीच्या लढती झाल्या. दोन मल्लांमधील अटीतटीच्या लढती दरम्यान टाळ्यांच्या कडकडाटाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. अनेक कुस्त्यांमध्ये मल्लांनी ‘एकलंगी’, ‘धोबीपछाड’ आणि ‘घिस्सा’ यांसारखे डावपेच टाकून प्रतिस्पर्ध्याला चितपट केले. यावेळी पाचुंदा परिसरातील आणि पंचक्रोशीतील हजारो कुस्तीप्रेमींनी मैदानात गर्दी केली होती. विजेत्या मल्लांना ग्रामस्थांच्या वतीने रोख बक्षिसे आणि मानचिन्हे देऊन गौरविण्यात आले.

ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आणि आपली कुस्ती परंपरा जिवंत ठेवण्यासाठी या हगाम्याचे आयोजन केले जाते असे यात्रा कमिटीच्या वतीने सांगण्यात आले.
कुस्त्यांच्या या मैदानाने यात्रेची सांगता झाली असून, शिस्तबद्ध नियोजन आणि खेळाडूंमधील खिलाडूवृत्तीमुळे हा सोहळा परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे.

संपूर्ण यात्रा यशस्वीरित्या पार पडण्यासाठी सरपंच कारभारी टकले, भास्कर चांडे, भिवाजी वाघमोडे,आदिनाथ माने, शिवाजी होंडे, मिताजी कोकरे, बिराजी वाघमोडे, महादेव चांडे, राजू टकले,बाळू वाघमोडे, रोहिदास होंडे,कैलास होंडे, जयराम वाघमोडे, साईनाथ माने,राधाकिसन टकले,देविदास टकले, बाबासाहेब गोफने, बाबासाहेब शिंदे,शंकर वाघमोडे,राजधर होंडे आदी ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेत नियोजन केले.