बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नियत वयोमानानुसार माणूस नोकरीतून निवृत्त होतो, पण कर्तव्यातून नाही, हा नवा आदर्श देडगावचे सुपुत्र आणि मुळा एज्युकेशन सोसायटीच्या सुरेगाव हायस्कूलचे प्राचार्य ज्ञानदेव गोरक्षनाथ कदम यांनी घालून दिला आहे. आपल्या ३२ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेचा समारोप करताना, कोणत्याही भपकेबाज निरोप समारंभावर खर्च न करता, त्यांनी तो संपूर्ण निधी सामाजिक संस्थांना दान करण्याचा स्तुत्य निर्णय घेतला आहे.
प्राचार्य कदम यांचा निरोप समारंभ मोठ्या थाटामाटात साजरा करण्याचे नियोजन त्यांच्या कुटुंबियांनी व सहका-यांनी केले होते, परंतु त्यांनी अशा कार्यक्रमांवरील नियोजीत खर्च टाळला. हा निधी त्यांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सामाजिक संस्था आणि वाचनालयांना सुपूर्द केला आहे. या निर्णयाचे समाजातील सर्व स्तरांतून त्यांचे कौतुक होत आहे.
त्यांच्या या अभिनव उपक्रमाची दखल घेऊन तक्षशिला ज्युनिअर कॉलेज व इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीने त्यांचा सपत्नीक विशेष सत्कार करण्यात आला. कदम सरांची सेवानिवृत्ती ही त्यांच्यासाठी सेवापुर्ती नाही, कारण ते तर सेवाव्रती आहेत. असे गौरवोदगार मन्वंतर संस्थेचे अध्यक्ष प्रोफेसर डॉ. विजय कदम यांनी काढले. प्रो. कदम यांच्या हस्ते ज्ञानदेव कदम यांचा गौरव करण्यात आला, त्यावेळी प्रो. कदम बोलत होते. उपस्थित मान्यवरांनी ज्ञानदेव कदम सर यांच्या कार्याचा गौरव करत त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
”आपण निरोप समारंभाच्या जेवणावळींवर मोठ्या प्रमाणावर खर्च करतो. ज्यांचे पोट आधीच भरलेले आहे, त्यांना जेवू घालण्यापेक्षा ज्यांना खरोखर मदतीची गरज आहे, अशा संस्थांना बळ देणे अधिक गरजेचे आहे,” असे उदगार प्राचार्य कदम यांनी सत्काराला उत्तर देताना काढले.
ज्ञानदेव कदम यांनी मुळा एज्युकेशन संस्थेच्या विविध विद्यालयांमध्ये इंग्रजी विषयाचे शिक्षक म्हणून ३२ वर्षे सेवा बजावली. त्यांची शिस्त, विषयावरील पकड आणि विद्यार्थ्यांप्रती असलेली आत्मयता यामुळे ते सदैव ‘विद्यार्थीप्रिय शिक्षक’ म्हणून ओळखले गेले. हजारो विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवण्यात आणि त्यांना सकारात्मक दिशा देण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे.मुळा एज्युकेशन
संस्थेच्या वतीने उत्तम काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख, माजी मंञी शंकररावजी गडाख, नेवासा संचायत समितीच्या उपसभापती सुनिताताई गडाख व उपाध्यक्ष उदयनदादा गडाख यांचे प्राचार्य ज्ञानदेव कदम यांनी आभार मानले. प्राचार्य कदम यांचा हा विचार समाजातील इतर नोकरदारांसाठी आणि शिक्षकांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे.

