घोडेगाव कांदा मार्केटमधील नव्या सहा व्यावसायिक गाळ्यांचा शुभारंभ उत्साहात

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- कृषी उत्पन्न बाजार समिती उप आवार घोडेगाव येथील कांदा मार्केटमध्ये नव्याने बांधण्यात आलेल्या सहा व्यावसायिक गाळ्यांचा शुभारंभ माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या शुभहस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
या कार्यक्रमाला नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन नंदकुमार पाटील, व्हा. चेअरमन नानासाहेब नवथर, नानासाहेब रेपाळे, अशोकराव येळवंडे, बाळासाहेब सोनवणे,राजेंद्र सानप, सचिव देवदत्त पालवे यांच्यासह परिसरातील शेतकरी, व्यापारी, हमाल, मापाडी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमावेळी बोलताना मा. मंत्री शंकरराव गडाख यांनी घोडेगाव कांदा मार्केटच्या स्थापनेपासूनचा प्रवास उपस्थितांसमोर उलगडला. त्यांनी सांगितले की, सुमारे २५ वर्षांपूर्वी अनेक अडचणी आणि मर्यादा असतानाही घोडेगाव येथे कांदा मार्केट सुरू करण्यात आले. त्या काळात बाजार उभा करण्यासाठी अनेक संघर्ष करावे लागले, मात्र शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या सहकार्यामुळे हे मार्केट आज महाराष्ट्रातील प्रमुख कांदा मार्केटपैकी एक म्हणून ओळखले जाते, ही अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.

नव्याने सुरू करण्यात आलेले सहा व्यावसायिक गाळे बाजारातील शेतकरी, व्यापारी, हमाल, मापाडी यांच्यासाठी अधिक सुविधा उपलब्ध करून देणार असून बाजाराच्या विकासाला चालना मिळणार आहे. कार्यक्रमानंतर माजी मंत्री  गडाख यांनी घोडेगाव येथील शेळी, मेंढी, म्हैस आणि गाईंच्या बाजाराला भेट दिली. यावेळी त्यांनी शेतकरी, व्यापारी, हॉटेल व्यावसायिक तसेच इतर व्यावसायिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी आणि व्यवसायाची माहिती जाणून घेतली.
गडाख यांच्या या आपुलकीच्या भेटीमुळे बाजार परिसरातील शेतकरी व व्यापाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. अनेकांनी त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधत समाधान व्यक्त केले.
दरम्यान, या आठवड्यात ईद सण असल्यामुळे घोडेगावच्या पशू बाजारात मोठ्या प्रमाणात बोकड विक्रीसाठी दाखल झाले होते. विशेष म्हणजे काही बोकडांची विक्री लाखो रुपयांमध्ये झाल्याची माहिती समोर आली. मा. गडाख यांनी स्वतः शेळी बाजारात जाऊन पाहणी करत व्यापाऱ्यांकडून विक्रीची माहिती घेतली व बाजारातील व्यवहारांची पाहणी केली./घोडेगाव बाजारातील वाढती उलाढाल, व्यापाऱ्यांची वाढती संख्या आणि नव्या सुविधांमुळे परिसरातील आर्थिक व्यवहारांना मोठी चालना मिळत असल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले.