बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेत सेवानिवृत्त शिक्षक गोरक्षनाथ नांगरे गुरुजी यांच्या सहस्रचंद्रदर्शन सोहळ्यानिमित्त तसेच संदीप नांगरे सर यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संत गाडगे महाराज यांच्या आत्मचरित्राचे पुस्तके भेट देण्यात आली. समाजात वाचन संस्कृती रुजावी आणि संत साहित्याचा प्रचार-प्रसार व्हावा या उद्देशाने संदीप नांगरे सर यांनी केंद्र शाळेअंतर्गत येणाऱ्या १८ शाळांना प्रत्येकी एक हजार रुपयांपर्यंतची संत गाडगे महाराज यांच्या आत्मचरित्राची पुस्तके भेट देणार असल्याची घोषणा केली. त्यांच्या या उपक्रमाचे उपस्थित शिक्षक, पालक व मान्यवरांनी कौतुक केले.
कार्यक्रमात गोरक्षनाथ नांगरे गुरुजी यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा गौरव करण्यात आला. उपस्थितांनी त्यांना सहस्रचंद्रदर्शनानिमित्त शुभेच्छा दिल्या, तसेच संदीप नांगरे सर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रप्रमुख भास्कर तांबे सर यांनी केले. सत्कारास उत्तर देत संदीप नांगरे सर यांनी आपल्या संकल्पाबाबत माहिती दिली. या कार्यक्रमास मुख्याध्यापक संभाजी कडू सर, सहशिक्षक, सुवर्णा काळे, सुवर्णा जाधव, संध्या मुंगसे, वैशाली पवार आदी शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, ग्रामस्थ व विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन युनूस पठाण यांनी केले तर आभारप्रदर्शन काळे मॅडम यांनी केले.


