मुळा धरणाच्या आवर्तनासाठीचे आजचे आंदोलन तात्पुरते स्थगित

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील रस्तापूर, चांदा, कौठा, पाचुंदा, माका, महालक्ष्मी हिवरे, तेलकुडगाव देडगाव आणि अमरापूर या परिसरात यंदा अत्यंत कमी प्रमाणात पाऊस झाला आहे. त्यामुळे मुळा धरणातून तातडीने आवर्तन सोडावे, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून करण्यात आली होती. याबाबत कार्यकारी अभियंता, मुळा पाटबंधारे विभाग, अहिल्यानगर यांना निवेदन देऊन तातडीने पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली होती. मागणी मान्य न झाल्यास आज १७ ऑगस्ट २०२६ रोजी विभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र, जलसंपदा विभागाच्या अधिकारी सायली पाटील यांनी संपर्क साधत जास्तीत जास्त पाणी मागणी अर्ज करण्याची मागणी केली आहे.
तसेच दुरुस्तीची सुरू असलेली कामे पूर्ण झाल्यानंतर जलसंपदा मंत्र्यांशी चर्चा करून शक्य तेवढे तातडीने आवर्तन सोडण्याचे आश्वासन दिल्याने आजचे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
सध्या शेतातील खरीप पिके करपू लागली असून शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. अनेक भागांमध्ये मका, बाजरी, सोयाबीन,कपाशी,तुर तसेच इतर पिकांना पाण्याअभावी फटका बसत आहे. सध्या मुळा धरणात समाधानकारक जलसाठा असून ओव्हरफ्लो होणारे पाणी मुळा कॅनॉलमार्फत शेतीसाठी उपलब्ध करून दिल्यास हजारो एकर क्षेत्राला दिलासा मिळू शकतो. त्यामुळे मुळा धरणातून तातडीने आवर्तन सोडावे, तसेच लाभधारक शेतकऱ्यांनी तातडीने पाणी मागणी अर्ज भरावेत, अशी मागणी भगवान गंगावणे , देडगावचे सरपंच चंद्रकांत मुंगसे, माणिकराव होंडे, मच्छिंद्र म्हस्के, लक्ष्मण पांढरे, सुरेशराव डिके ,गोरख घुले, प्रा. स्वरूपचंद गायकवाड, संजय पवार, मल्हारी सांगळे यांनी केली आहे.