बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- भाविकांच्या भक्तीला आनंद देणारा आणि गेल्या अनेक वर्षांची धार्मिक परंपरा जपणारा अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी १८ अध्याय गीता पारायण सोहळा आजपासून(ता. २९) भक्तिमय वातावरणात आयोजित करण्यात आला आहे. बालाजी देडगाव(कोकरे वस्ती), ता. नेवासा, जि. अहिल्यानगर येथे हा धार्मिक सोहळा बाबिरबाबांच्या कृपा आशिर्वादाने तसेच हभप सुखदेव महाराज मुंगसे व हभप सदाशिव महाराज पुंड यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार दि. २९ ऑगस्ट २०२६ ते बुधवार दि. २ सप्टेंबर २०२६ या कालावधीत होणार आहे.
यंदा या सप्ताहाचे ३२ वे वर्ष असून, परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
या सप्ताह काळात दररोज पहाटे ४ ते ५ काकडा, सकाळी ७ ते ११ ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ, रात्री ७ ते ९ हरिकीर्तन व त्यानंतर हरिजागर असा कार्यक्रम होणार आहे. सप्ताहात संतवृंदांच्या माध्यमातून ज्ञानदानाचा सोहळाही आयोजित करण्यात आला आहे.
कीर्तनाचा कार्यक्रम
शनिवार, दि. २९ ऑगस्ट : ह.भ.प. सुखदेव महाराज मुंगसे (बालाजी देडगाव), रविवार, दि. ३० ऑगस्ट : ह.भ.प. सूर्यभान महाराज केसभट, सोमवार, दि. ३१ ऑगस्ट : ह.भ.प. पंडित महाराज आव्हाड, मंगळवार, दि. १ सप्टेंबर : रामायणाचार्य ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज तांबे यांची किर्तनसेवा होणार आहे.
तर बुधवार, दि. २ सप्टेंबर रोजी ह.भ.प. दादा महाराज वायसळ यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता होणार आहे. सप्ताहाच्या सांगता दिवशी महाप्रसाद आयोजित करण्यात आला आहे.
या धार्मिक सोहळ्यासाठी विविध गावांतील वारकरी, भजनी मंडळे, कीर्तनकार व संत-महंत उपस्थित राहणार असून, भाविकांनी या सप्ताहाचा आणि ज्ञानेश्वरी पारायणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन समस्त ग्रामस्थ व भजनी मंडळ, बालाजी देडगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.

