बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र बालाजी देडगाव येथे वै. श्री समर्थ सदगुरु किसनगिरी बाबा व वै.बन्सी महाराज तांबे यांच्या कृपा आशीर्वादाने हभप गुरुवर्य भास्करगिरी महाराज व हभप स्वामी प्रकाशानंद गिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाने व हभप सुखदेव महाराज मुंगसे, हभप अखिलेश महाराज गोयकर यांच्या अधिपत्याखाली स्वयंभू बालाजी मंदिर येथे बालाजी यात्रा उत्सवानिमित्त रविवार (ता.१८) पासून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. तर शनिवारी (ता.१७) सकाळी ९ वाजता प्रमुख मान्यवर व ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये धर्म ध्वजारोहण होणार आहे. यानिमित्ताने हभप गुरुवर्य महंत भास्करगिरी महाराज सदिच्छा भेट देणार आहेत.
सप्ताहादरम्यान श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व काकडा, हरिपाठ, प्रवचन, भजन तसेच हरिनामाचा गजर अशा विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे. त्यानिमित्ताने हभप भागचंद महाराज पाठक, हभप दादा महाराज वायसळ, हभप सुखदेव महाराज मुंगसे, हभप गुरुवर्य धनराज पाटील महाराज, हभप महंत रामगिरी महाराज येळीकर, हभप रामायणाचार्य हनुमंत महाराज, हभप महंत आदिनाथ महाराज शास्त्री या नामवंत महाराजांची सायंकाळी ७ ते ९ वेळेत कीर्तनसेवा पार पडणार आहे. तर मंगळवारी (ता.२०) दसरा निमित्ताने सालाबादप्रमाणे गावातून मोठ्या उत्साहात बालाजी पालखी मिरवणूक सोहळा पार पडणार आहे.
तर रविवारी (ता.२५) सकाळी ९ते ११ हभप महंत स्वामी प्रकाशनंदगिरी महाराज, श्री क्षेत्र देवगड संस्थान यांचे काल्याचे किर्तन होईल. तदनंतर काल्याचा महाप्रसाद होईल. तसेच सोमवारी (ता.२६) श्री बालाजी यात्रा उत्सव पार पडणार आहे. तर बुधवारी (ता.२८) सकाळी ९ ते ११ हभप गुरुवर्य देविदास महाराज म्हस्के (श्री क्षेत्र नेवासा संस्थान) यांचे किर्तन होऊन तिर्थप्रसादाने यात्रेची सांगता होईल. सप्ताह निमित्ताने दररोज येणाऱ्या भाविकांसाठी सकाळी व सायंकाळी अन्नदानाचे आयोजन करण्यात आले आहे.
सप्ताहाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री स्वयंभू बालाजी देवस्थान ट्रस्ट व समस्त ग्रामस्थ व भजनी मंडळ, गावातील तरुण मित्रमंडळ प्रयत्नशील आहेत. या धार्मिक सोहळ्याचा लाभ परिसरातील भाविकांनी घ्यावा, असे आवाहन देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.

