अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या १७ जागांवर विखे- थोरात गटाचे वर्चस्व ; पारनेरमधून खासदार निलेश लंके विजयी

आपला जिल्हा

नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या १० संचालक जागांचा निकाल आज जाहीर झाला. या दहा पैकी ७ जागा सहकार विकास पॅनलने म्हणजेच विखे- थोरात गटाने जिंकल्या. तर पारनेर सोसायटी मतदारसंघातून खासदार निलेश लंके विजयी झाले. कर्जत सोसायटी मतदारसंघातून ज्योती प्रकाश शिंदे व अकोले सोसायटी मतदारसंघातून संजीवनी गोविंद शिंदे यांनी विजय मिळवला. जिल्हा बँकेचे २१ पैकी ११ संचालक बिनविरोध निवडून आले आहेत. बाकी १० जागेसाठी सोमवारी मतदान प्रक्रिया झाली होती. आज कल्याण रोड बायपास चौकातील अमरज्योत लॉन्स येथे मतमोजणीची प्रक्रिया पार पडली. मतमोजणी प्रक्रिये दरम्यान सर्वाधिक लक्ष केंद्रित होते ते पारनेर सोसायटी मतदार संघाच्या निकालाकडे. मतमोजणी केंद्र बाहेर खासदार निलेश लंके यांच्या समर्थकांची सर्वात जास्त गर्दी होती. त्यातच अन्य उमेदवार आणि त्यांचे समर्थक यांची भर पडली. त्यामुळे कल्याण रस्ता बायपास चौक परिसर गर्दीने फुलून गेला होता. सुरुवातीलाच पारनेर सोसायटी मतदारसंघातील कल लक्षात आला. आकड्यांची खातरजमा होताच खासदार लंके यांचे पी ए शिवाजी कराळे मतमोजणी केंद्रातून धावतच बाहेर गेले आणि त्यांनी लंके यांनी पारनेर मधून बाजी मारल्याची बातमी समर्थकांना दिली. त्यानंतर खासदार लंके यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष सुरू केला. दरम्यानच्या काळात कर्जत सोसायटी मतदारसंघातील ज्योती प्रकाश शिंदे यांचाह विजय स्पष्ट झाला. त्यांच्या समर्थकांनी देखील गुलालाची उधळण करीत आनंद व्यक्त केला. याच दरम्यान अकोले सोसायटी मतदारसंघातून संजीवनी शिंदे यांचा विजय स्पष्ट झाला. त्यांच्याही समर्थकांनी जल्लोष केला. या निवडणूक प्रक्रियेत संगमनेरमधून रणजीतसिंह देशमुख, नेवासा येथून माजी मंत्री शंकरराव गडाख, राहाता येथून डॉ. सुजय विखे पाटील, श्रीरामपूरमधून करण ससाणे, पाथर्डीतून आमदार मोनिका राजळे, शेवगावमधून राजश्री घुले पाटील, श्रीगोंद्यातून दत्तात्रय पानसरे, कोपरगावमधून बिबिन कोल्हे, नगर तालुक्यातून अक्षय कर्डिले आणि बिगरशेती मतदारसंघातून सचिन जगताप यांची यापूर्वीच बिनविरोध निवड झाली होती.

उमेदवार व त्यांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे-

महिला राखीव (2 जागा)

अनुराधा नागवडे    : २६४१ – विजयी 
संगीता वाघ           : २२९२ – विजयी 
हर्षदा काकडे         : १४८९  
संध्या महांडुळे        : ४६४.  

 

भटक्या जमाती विमुक्त जाती

गणपतराव सांगळे    : २४६१  – विजयी 
ऋषिकेश ढाकणे     : १२८७

 

इतर मागास प्रवर्ग

कारभारी जावळे     : २६७६   – विजयी 
जालिंदर वाकचौरे    : ७३३

 

अनुसूचित जाती जमाती

वैभव पिचड    : २६९० – विजयी 
प्रशांत लोखंडे : १०८६

 

पारनेर सोसायटी मतदारसंघ

खासदार निलेश लंके : ६४  – विजयी 
राहुल शिंदे.   : ४०  

कर्जत सोसायटी मतदारसंघ

ज्योती प्रकाश शिंदे :  ५४  – विजयी 
तुषार अंबादास पिसाळ : २०

राहुरी सोसायटी मतदारसंघ
प्राजक्त तनपुरे.      : ८९-  – विजयी
सत्यजित कदम     : १८

अकोले सोसायटी मतदारसंघ

संजीवनी शिंदे.      : ४९-   विजयी
किरण लहामटे     : ३६