जनशक्ती (वृत्तसेवा)- माहेगाव देशमुख (ता. कोपरगाव, जि. अहिल्यानगर) येथील कु. डॉ. पल्लवी रमेश गावित्रे यांनी वैद्यकीय क्षेत्रातील एम.बी.बी.एस. ही पदवी यशस्वीरित्या संपादन केली आहे. त्यांचे वैद्यकीय शिक्षण डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर येथे पूर्ण झाले.
त्यांनी शैक्षणिक प्रवासात उल्लेखनीय यश संपादन केले असून दहावी परीक्षेत ९५ टक्के व बारावी परीक्षेत ९० टक्के गुण प्राप्त केले आहेत. तसेच कोरोना काळात २०२० साली कोणत्याही खासगी क्लासशिवाय प्रथम प्रयत्नात NEET परीक्षेत ५१३ गुण मिळवून त्यांनी वैद्यकीय शिक्षणासाठी पात्रता मिळवली.
त्या रमेश लक्ष्मण गावित्रे व स्वाती रमेश गावित्रे यांची कन्या असून त्यांच्या या यशाबद्दल गाव व परिसरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. भविष्यात त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करावे, अशा शुभेच्छा सर्व स्तरातून व्यक्त करण्यात येत आहेत.

