शासकीय सेवेला गवसणी घालणाऱ्या देडगावच्या भूमिपुत्रांचा भव्य नागरी सन्मान

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर ग्रामीण भागातील तरुणही यशाची उत्तुंग शिखरे सर करू शकतात, हे नेवासा तालुक्यातील देडगावच्या पाच सुपुत्रांनी सिद्ध केले आहे. पोलीस दलात चार तरुणांची आणि रेल्वे विभागात एकाची निवड झाल्याबद्दल देडगाव ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा भव्य ‘नागरी सत्कार’ सोहळा उत्साहात पार पडला.

यावेळी पोलीस दलात निवड झालेले कु. ज्योती संतोष देवकाते, दादासाहेब गोरख देवकाते, ईश्वर अशोक काटकर,शंकर नवनाथ गोयकर चार पोलीस जवान आणि रेल्वे विभागात लिपिक अभिमन्यू अर्जुन पुंड पदावर निवड झालेल्या तरुणाचा फेटा शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून या तरुणांनी हे यश मिळवल्याने संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुळा एज्युकेशन संस्थेचे विश्वस्त बाजीराव पाटील मुंगसे होते.
यावेळी चेअरमन सागर बनसोडे सर प्रस्ताविकात म्हणाले की,
शहरातील सोयीसुविधा नसतानाही केवळ मेहनतीच्या जोरावर आमच्या गावातील मुलांनी सरकारी नोकरी मिळवून गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. ही इतर तरुणांसाठी मोठी प्रेरणा आहे. आज पाच यशस्वी फेटे बांधली गेली आहेत पुढच्या वर्षी याच ठिकाणी दहा फेटे बांधण्याचा योग येईल. असे प्रतिपादन केले.
यावेळी सरपंच चंद्रकांत मुंगसे, जिल्हा परिषद शिक्षक संजयकुमार लाड, युवा नेते निलेश कोकरे, सेल टॅक्स ऑफिसर सोमेश्वर देवकाते यांनी आपले मनोगत व्यक्त करून अभिनंदन करत पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
सत्काराला उत्तर देताना यशस्वी उमेदवारांनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडील आणि शिक्षकांना तसेच अहिल्याबाई होळकर शाळा व कै. लक्ष्मण वांढेकर गुरुजी वाचनालय यांना दिले.स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या इतर ग्रामीण तरुणांनी खचून न जाता सातत्य ठेवल्यास यश नक्की मिळते, असा संदेशही त्यांनी यावेळी दिला.
या सन्मान सोहळ्यासाठी पंचायत समितीचे माजी उपसभापती कारभारी चेडे, कृषी अधिकारी संजय कदम, प्रगतशील शेतकरी बन्सी पाटील मुंगसे, ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके, सोसायटीचे सचिव रामा तांबे, बालाजी देवस्थानचे विश्वस्त सुभाष मुंगसे,श्रीमंत पुंड,कानिफनाथ पुंड, विश्वास हिवाळे,नितीन हिवाळे, शिवाजी बनसोडे, हरिभाऊ गोयकर, संपत ससाने, गंगाधर तांबे,हरिभाउ बावधनकर, गोरख देवकाते,नवनाथ गोयकर,व्हॉइस चेअरमन जनार्धन देशमुख,माजी चेअरमन रामा गोयकर, संतोष देवकाते, अर्जुन पुंड,अशोक काटकर आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार युनूस पठाण यांनी केले तर आभार पावन गणपती देवस्थानचे विश्वस्त अशोक मुंगसे यांनी मानले.