बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील माका येथे वै. गुरुदेव शांतीब्रम्ह तुकाराम बाबांच्या पुण्यतिथीनिमित्त हभप महंत गुरुवर्य सुरेशानंदजी महाराज शास्त्री (श्री क्षेत्र श्रृंगऋषीगड) बाबांच्या शुभहस्ते आयोजित श्री क्षेत्र श्रृंगॠषीगडाचा दुसऱ्या नारळी सप्ताहास उद्यापासून (ता.२४) मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने सुरूवात होत आहे. दि. २४ एप्रिल ते १ मे २०२६ दरम्यान चालणाऱ्या या सप्ताहात विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळणार आहे.
या सप्ताहकाळात दररोज पहाटे ४ ते ६ काकडा भजन, ६ ते ७ विष्णुसहस्रनाम, ७ ते १० ज्ञानेश्वरी पारायण, सकाळी १० ते १२ कीर्तन, २ ते ५ श्रीमद् भागवत कथा, सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ व रात्री ९ ते ११ हरिकिर्तन व नंतर जागर अशा दैनंदिन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी १ ते ४ या वेळेत श्रीमद् भागवत कथा ह.भ.प गणेश महाराज वारंगे (मादळमोही) यांची कथा होणार आहे. सकाळी १० ते १२ व रात्री ९ ते ११ या वेळेत नामवंत किर्तनकारांची किर्तने होणार आहेत. या सप्ताह काळात सकाळी १० ते १२ या वेळेत हभप ज्ञानेश्वर महाराज तांबे (जेऊर हैबती), हभप महंत राम महाराज झिंजुर्के (जोग म.सं. आष्टीगाव), हभप भागवत महाराज शास्त्री (ज्ञानाई आश्रम जालना), हभप महंत गुरुवर्य स्वामी जनार्दन महाराज (मच्छिंद्रगड), हभप लक्ष्मण महाराज कदम शास्त्री (आळंदी), हभप महंत रोहिदास महाराज शास्त्री (राजे धर्मगाव, हातोला) यांची किर्तनसेवा होणार आहे.
तर रात्री ९ ते ११ या वेळेत हभप उमेश महाराज दशरथी (आळंदी), हभप बद्रीनाथ महाराज नवल (गीताभवन पैठण), हभप अनिल महाराज पाटील (बार्शीकर), हभप ज्ञानेश्वर महाराज जळकेकर (जळगाव), हभप अक्रुर महाराज साखरे (गेवराई), हभप गुरुवर्य आदिनाथ महाराज शास्त्री (तारकेश्वरगड), हभप विशाल महाराज खोले (मुक्ताईनगर) यांची किर्तनसेवा होणार आहे. तसेच समारोपाच्या दिवशी शुक्रवारी (ता.१) हभप महंत गुरुवर्य सुरेशानंदजी महाराज शास्त्री (श्री क्षेत्र श्रृंगऋषीगड ) यांचे काल्याचे कीर्तन व त्यानंतर सामुदायिक महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. .या धार्मिक सोहळ्यामुळे माका व पंचक्रोशी परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून भाविक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. तरी सर्व भाविकांनी उपस्थित राहून या पुण्यसोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
माका येथे सुरू असलेल्या सप्ताहामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून हरिकिर्तन व भागवत कथेमुळे भाविकांना आध्यात्मिक समाधान मिळत आहे. आयोजकांचे उत्तम नियोजन आणि भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे कार्यक्रम यशस्वी ठरत आहे, अशी प्रतिक्रिया गुरूवर्य हभप सुरेशानंदजी महाराज शास्त्री यांनी दिली आहे.

