बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील तेलकुडगाव येथे महिला सुसंस्कार अभियानांतर्गत भव्य स्त्री जागृती कीर्तन महोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त आयोजित महिला अखंड हरिनाम सप्ताहाची काल्याच्या किर्तनाने उत्साहात सांगता झाली. भगवान नागनाथाच्या कृपाशीर्वादाने तसेच जनता जनार्दनाच्या सहकार्याने हा धार्मिक व सांस्कृतिक सोहळा उत्साहात पार पडला.
महंत गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज, गुरुवर्य बन्सी महाराज तांबे, देविदास महाराज म्हस्के तसेच रामायणाचार्य हनुमंतजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने हा सोहळा पार पडला. हभप नवनाथ महाराज घाडगे, श्रीधर महाराज घाडगे, अमोल महाराज घाडगे, महेश महाराज घाडगे व धनुर्धर महाराज घाडगे यांच्या प्रेरणेने तसेच सुप्रसिद्ध कीर्तनकार जयाताई महाराज घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. हभप भागवताचार्य जयाताई महाराज घाडगे यांच्या काल्याच्या किर्तनाने या सोहळ्याची सांगता झाली.
मंगळवारी सकाळी ७ ते ८ या वेळेत दिंडी प्रदक्षिणेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रत्नमालाताई विठ्ठलराव लंघे यांनी उपस्थित राहून महिलांना मार्गदर्शन केले व प्रोत्साहन दिले. हभप नवनाथ महाराज घाडगे व हभप अमोल महाराज घाडगे यांनी सर्व महिला भगिनींचे आभार मानले. गावातील सर्व भजनी मंडळ यांनी चांगले सहकार्य केले. सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, सर्व ग्रामस्थ, महिला मंडळ, सोसायटी सर्व पदाधिकारी सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सप्ताहामध्ये हभप जयाताईंनी एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवला होता. ज्या मुली शिक्षण पूर्ण विविध क्षेत्रात यशस्वी झाल्या या मुलींचे आई-वडिलांसह सत्कार दररोजच्या कीर्तनामध्ये करण्यात आले. तसेच सेवानिवृत्त अंगणवाडी सेविकेचाही सत्कार यावेळी करण्यात आला. काल्याच्या कीर्तनामध्ये सर्व उपस्थित महिला भगिनींनी पुरणपोळी व धोंडा जेवण दिले.
त्याचप्रमाणे आमटी भात आणि गुळवणी या महाप्रसादाचे अनिता कचरू गायकवाड, ज्योती कुशीनाथ गायकवाड, मंगल बबनतात्या म्हस्के, चंद्रकला हरिभाऊ गटकळ, रुक्मिणी दत्तात्रय घोडेचोर यांनी महाप्रसादाचे नियोजन केले.

