बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील कुकाणा येथील भूमिकन्या प्राजक्ता संजय कचरे यांनी राज्य लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून एकाच वेळी तीन महत्त्वपूर्ण पदांवर नियुक्ती झाल्याबद्दल देडगाव ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. प्राजक्ता कचरे यांनी आपल्या गुणवत्तेच्या जोरावर सहाय्यक कक्ष अधिकारी (ASO), राज्य कर निरीक्षक (STI) व उपनिबंधक (SR) या तीन शासकीय पदावर निवड झाली. त्यांच्या या यशाबद्दल देडगाव ग्रामस्थांनी आनंद व्यक्त करत त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. तसेच प्राजक्ता कचरे यांचा बालाजी देवस्थान ट्रस्ट व अहिल्याबाई होळकर विद्यालय यांच्या वतीनेही सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच बाजीराव पाटील मुंगसे होते. तर प्रास्ताविक भाऊसाहेब सावंत सर यांनी करत आपण पुन्हा यूपीएससीच्या माध्यमातून पोस्ट मिळवावी व जिल्हाधिकारी म्हणून आम्हाला सन्मान करण्याचा योग घडवून आणावा म्हणत पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
यावेळी सरपंच चंद्रकांत मुंगसे म्हणाले की, ग्रामीण भागातील मुलांमध्ये गुणवत्ता आहे व अभ्यास ध्येय व सातत्यपूर्ण प्रामाणिक कष्ट यामुळे आज हे पद संपादन केले आहे. प्राजक्ता कचरे यांनी सत्काराबद्दल ग्रामस्थांचे आभार मानत, भविष्यातही मिळालेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा विश्वास व्यक्त केला. मला ओळखत नसूनही आपण सर्वजण सन्मानास आला त्याबद्दल सर्वांचे आभार मानत ग्रामीण भागातील पालकांनी मुलावर विश्वास ठेवावा व त्यांना संधी उपलब्ध करून दिल्यास नक्की सोन करतील असा आत्मविश्वास व्यक्त केला. त्यांच्या या यशामुळे कुकाणा गावाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
यावेळी देवराव तात्या मुंगसे, आजिनाथ आठरे, माजी सरपंच दत्ता पाटील मुंगसे, माजी उपसरपंच महादेव पुंड, माजी उपसरपंच बाळासाहेब मुंगसे, निलेश कोकरे, अहिल्याबाई होळकर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयात करण्यात आलेल्या सन्मान प्रसंगी मुख्याध्यापक किशोर मुंगसे व सर्व शिक्षक उपस्थित होते.
यावेळी प्राजक्ता कचरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्राजक्ता कचरे यांचा बालाजी देवस्थानच्या कार्यालयामध्येही सन्मान करण्यात आला. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष भाऊसाहेब मुंगसे, विश्वस्त सुभाष मुंगसे तसेच देवस्थानचे खजिनदार संभाजीराजे काजळे उपस्थित होते.
यावेळी पोपटराव बनसोडे, भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष आकाश चेडे, जेऊर गावचे सरपंच रामदास खराडे, महादेव मुंगसे, रमेशदेवा तांदळे, संदीप चेडे, संजय तांबे, चांगदेव टकले आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार युनूस पठाण यांनी केले तर आभार ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके यांनी मानले.

