जनशक्ती (वृत्तसेवा)- श्रीक्षेत्र धनगरवाडी, ता. राहाता येथे सुरू असलेल्या सद्गुरु संत योगीराज गंगागिरी महाराज सप्ताहाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी भेट देत ह.भ.प. रामगिरी महाराज यांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमुळे सप्ताहस्थळी भक्तिमय वातावरणात उत्साहाची भर पडली.
शिर्डी विमानतळावर आगमन झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोटारीने श्रीक्षेत्र धनगरवाडी येथे सुरू असलेल्या सप्ताहस्थळी भेट दिली. यावेळी त्यांनी ह.भ.प. रामगिरी महाराज यांची भेट घेऊन संतांचे आशीर्वाद घेतले तसेच सप्ताहासाठी उपस्थित भाविकांना शुभेच्छा दिल्या.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या आगमनावेळी नेवासा मतदारसंघाचे आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी गुलाबपुष्प देऊन त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. यावेळी आमदार लंघे पाटील यांनी नेवासा तालुक्यातील विविध विकासकामे व जनतेच्या प्रश्नांबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा केली.
यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार अमोल खताळ, आमदार आशुतोष काळे, आमदार विवेक कोल्हे, आमदार रमेश बोरणारे, आमदार नितीन दिनकर, आमदार नितीन औताडे, धनंजय धोरडे, भाऊसाहेब कांबळे, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्यासह विविध मान्यवर, लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
सप्ताहाच्या निमित्ताने परिसरात राज्याच्या विविध भागांतून भाविक दाखल झाले असून मोठी गर्दी झाली आहे. संत-महंतांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या या धार्मिक सोहळ्याला मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी भेट दिल्याने सप्ताहाचे महत्त्व अधिकच अधोरेखित झाले.
संतपरंपरेचा समृद्ध वारसा, भक्तिमय वातावरण आणि राज्यातील प्रमुख लोकप्रतिनिधींची उपस्थिती यामुळे योगीराज गंगागिरी महाराज सप्ताहाचा सोहळा विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे.

