माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या उपस्थितीत ‘सोनईरत्न पुरस्कार’- 2026 चे वितरण

आपला जिल्हा

सोनई (प्रतिनिधी)- सोनईसह परिसराच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि सार्वजनिक जीवनात मोलाचे योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्त्वांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने प्रदान करण्यात येणारा ‘सोनईरत्न पुरस्कार – २०२६’ वितरण सोहळा विजयादशमीच्या पूर्वसंध्येला सोमवारी (ता.१९) यंदाचा सोनईरत्न पुरस्कार ज्येष्ठ नागरिक मंचाच्या माध्यमातून ज्येष्ठांना सोबत घेऊन सामाजिक व सांस्कृतिक कार्यात सक्रिय योगदान देणारे शिवलाल (शिवाशेठ) बाफना यांना प्रदान करण्यात आला. तसेच स्व. रामचंद्र (भाऊ) शेटे, स्व. मुरलीधर बोरुडे आणि स्व. दादा (रामचंद्र) वाघ यांना मरणोत्तर सोनईरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
ह.भ.प. उद्धव महाराज मंडलिक नेवासेकर, माजी मंत्री शंकरराव गडाख, विश्वासराव गडाख, प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष उदयन गडाख यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. मरणोत्तर पुरस्कार संबंधित मान्यवरांच्या कुटुंबीयांनी स्वीकारले. या वेळी दिवंगत व्यक्तींच्या सामाजिक योगदानाचे स्मरण करताना उपस्थित भावूक झाले.
यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी समाजहितासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान केला जातो. सोनईच्या सामाजिक आणि सांस्कृतिक विकासात योगदान देणाऱ्या व्यक्तींच्या कार्याची ओळख नव्या पिढीला व्हावी आणि त्यांच्या सेवाभावी कार्यातून तरुणांना प्रेरणा मिळावी, हा या पुरस्कारामागील प्रमुख उद्देश आहे.
यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष उदयन गडाख यांनी प्रास्ताविकात पुरस्कारामागील भूमिका स्पष्ट केली. सोनई परिसराच्या विकासात योगदान देणाऱ्या व्यक्तींच्या कार्याची नव्या पिढीला ओळख व्हावी, तसेच समाजाने त्यांच्या सेवाभावी कार्याची कृतज्ञतापूर्वक आठवण ठेवावी, यासाठी सोनईरत्न पुरस्कार दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
माजी मंत्री शंकरराव गडाख म्हणाले, “सोनईरत्न पुरस्कार हा केवळ गौरव नसून सेवाभावाला दिलेला सलाम आहे.” गेल्या वर्षीपासून मरणोत्तर पुरस्काराची सुरुवात केल्यामुळे समाजासाठी कार्य केलेल्या अनेक थोर व्यक्तिमत्त्वांच्या योगदानाचा गौरव करता येणार असल्याचे त्यांनी नमूद केले. पुरस्कारप्राप्त मान्यवरांचे तसेच सोनई महोत्सवातील विविध उपक्रमांत सहभागी झालेल्या सर्वांचे त्यांनी अभिनंदन केले. माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या प्रेरणेने हा पुरस्कार दिला जातो असे म्हणाले.
ह.भ.प. उद्धव महाराज मंडलिक नेवासेकर म्हणाले ज्येष्ठ पिढीच्या कार्याचा सन्मान करणारे उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले. विजयादशमीच्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यामुळे पुरस्काराचे महत्त्व अधिक अधोरेखित झाले असल्याचे त्यांनी नमूद केले. यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या सामाजिक व सांस्कृतिक कार्याचे त्यांनी विशेष कौतुक केले.
या वेळी सोनई महोत्सवांतर्गत आयोजित विविध स्पर्धांतील विजेत्यांनाही पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. शिवलाल बाफना,राजेंद्र बोरुडे, बाळासाहेब शेटे , ह भ प
आप्पासाहेब निमसे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला महिला, युवक, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सोनई महोत्सवाच्या निमित्ताने गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, सोनईरत्न पुरस्कार हा केवळ व्यक्तींचा सन्मान न राहता गावाच्या सामाजिक व सांस्कृतिक परंपरेचा गौरव करणारा आणि नव्या पिढीला समाजसेवेची प्रेरणा देणारा उपक्रम ठरला.

 

सोनईरत्न पुरस्कार-२०२६

शिवलाल (शिवाशेठ) बाफना — सोनईरत्न पुरस्कार

मरणोत्तर सोनईरत्न पुरस्कार
स्व. रामचंद्र (भाऊ) शेटे
स्व. मुरलीधर बोरुडे
स्व. दादा (रामचंद्र) वाघ