बालाजी देडगाव (प्रतिनिधी) : संताचा जन्म हा समाजाच्या उद्धारासाठी असतो. देवाला जाणून घेण्याची पहिली पायरी हे संतच असतात, असे प्रतिपादन हभप स्वामी अमृतानंद सरस्वती माताजी यांनी केले. तेलकुडगाव (घोडेचोर वस्ती), ता. नेवासा, जि. अहिल्यानगर येथे कै. नामदेव भगवंत घोडेचोर यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त रविवार, दि. २२ नोव्हेंबर २०२६ रोजी आयोजित किर्तन सेवेप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
कै. नामदेव भगवंत घोडेचोर यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आमदार विठ्ठलराव लंघे पाटील, तेलकुडगाव परिसरातील ग्रामस्थ व नागरिक आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी कै. नामदेव घोडेचोर यांना श्रद्धांजली अर्पण करताना आमदार विठ्ठलराव लंघे पाटील म्हणाले,
घोडेचोर कुटुंबाला मोठी वारकरी परंपरा लाभली आहे. कै. नामदेव भगवंत घोडेचोर हे खूप धार्मिक वृत्तीचे होते. त्यांनी दोन वेळेस सपत्नीक चारधाम यात्रा केली असून त्यांनी पंढरपूरची आषाढी वारी व पैठणची वारी कधीही चुकवली नाही. दररोज हरीपाठ व ग्रंथवाचन ते नियमित करत असत.
यावेळी कै. नामदेव घोडेचोर यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी नातेवाईक, मित्रपरिवार, ग्रामस्थ आणि परिसरातील भाविक उपस्थित होते.

