जनशक्ती (वृत्तसेवा)- महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी अहिल्यानगर येथील ज्येष्ठ साहित्यिक तथा माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या ‘विरंगुळा’ निवासस्थानी सदिच्छा भेट देत विविध सामाजिक, राजकीय आणि समकालीन विषयांवर मनमोकळी चर्चा केली.
या प्रसंगी प्रा. राम शिंदे यांनी यशवंतराव गडाख यांच्या प्रदीर्घ सार्वजनिक जीवनातील अनुभव, साहित्यिक योगदान, सामाजिक कार्य आणि विकासात्मक विचारांचा गौरव केला. समाजकारण व लोकहिताच्या विविध प्रश्नांवर त्यांच्या अनुभवातून मोलाचे मार्गदर्शन लाभल्याचे सांगत, त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
सदिच्छा भेटीदरम्यान ज्येष्ठ साहित्यिक यशवंतराव गडाख व उद्योजक विजयराव गडाख यांच्या हस्ते प्रा. राम शिंदे यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. गडाख कुटुंबीयांनी आत्मीयतेने स्वागत करत सभापतींचा सन्मान केला.
या भेटीत राज्याच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि विकासात्मक विषयांवर सकारात्मक विचारांची देवाणघेवाण झाली. विविध क्षेत्रातील अनुभवांचा लाभ समाजाला कसा होईल, यावरही उपस्थितांमध्ये सविस्तर चर्चा झाली.



