बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- मुळा एज्युकेशन सोसायटीच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, माका येथे गुरुपौर्णिमेनिमित्त प्रेरणादायी व उत्साहपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. निवृत्ती मिसाळ हे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्रा. शहाबाज सय्यद यांनी गुरुपौर्णिमेचे सांस्कृतिक व शैक्षणिक महत्त्व अधोरेखित केले तसेच कार्यक्रमामागील उद्देश स्पष्ट केला. 
यानंतर प्रा. मंदार कुलकर्णी, प्रा. दत्ता कोकाटे आणि प्रा. अमोल दरंदले यांनी गुरूचे जीवनातील अनन्यसाधारण स्थान, भारतीय संस्कृतीतील गुरू-शिष्य परंपरा तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासामध्ये गुरूची असलेली भूमिका याविषयी प्रेरणादायी मनोगते व्यक्त केली. त्यांच्या विचारांनी विद्यार्थ्यांना ज्ञान, संस्कार, मूल्याधिष्ठित जीवन आणि आदर्श व्यक्तिमत्त्व घडविण्याची प्रेरणा मिळाली.
कार्यक्रमाची अध्यक्षीय सूचना प्रा. डॉ. अमोल दहातोंडे यांनी मांडली, तर अध्यक्षीय ठरावाचे अनुमोदन प्रा. शाहिदास काळे यांनी केले.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. निवृत्ती मिसाळ यांनी गुरू हा विद्यार्थ्यांच्या जीवनाला योग्य दिशा देणारा दीपस्तंभ असल्याचे सांगितले. शिक्षणाबरोबरच शिस्त, संस्कार, नैतिक मूल्ये आणि सामाजिक बांधिलकी यांचा अंगीकार करून विद्यार्थ्यांनी आदर्श नागरिक बनावे, असा मोलाचा संदेश त्यांनी दिला.
कार्यक्रमाचे नियोजन प्रा. शहाबाज सय्यद यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रा. प्राजक्ता गायके यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले.
शेवटी प्रा. डॉ. ज्ञानेश्वर पादर यांनी उपस्थित मान्यवर, प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी आणि सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले. उत्साहपूर्ण, प्रेरणादायी आणि भक्तिमय वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.


