जनशक्ती (वृत्तसेवा)- अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संगमनेर येथे जिल्ह्यातील प्रमुख राजकीय नेते, लोकप्रतिनिधी आणि सहकार क्षेत्रातील मान्यवरांची बैठक पार पडली. दुष्काळी परिस्थिती, शेतकरी व सहकार क्षेत्रासमोरील आव्हाने लक्षात घेता बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वांनी सकारात्मक प्रयत्न करण्याची भूमिका बैठकीत व्यक्त करण्यात आली.
या बैठकीला माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री शंकरराव गडाख, माजी खासदार सुजय विखे पाटील, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार आशुतोष काळे, आमदार संग्राम जगताप, आमदार हेमंत ओगले, आमदार विवेक कोल्हे, आमदार विक्रम पाचपुते, आमदार प्राजक्त तनपुरे, आमदार काशिनाथ दाते, आमदार अक्षय कर्डिले, श्रीरामपूरचे नगराध्यक्ष करण ससाने, श्रीगोंदा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे, ज्येष्ठ नेते भगवानराव पाचपुते आणि प्रतापसिंह पाचपुते उपस्थित होते.
आमदार मोनिका राजळे आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष चंद्रशेखर घुले यांनी ऑनलाइन माध्यमातून बैठकीत सहभागी होत या भूमिकेला पाठिंबा दर्शविला.
राजकीय मतभेद बाजूला ठेवून जिल्ह्याच्या सहकार क्षेत्राच्या व्यापक हितासाठी बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न करण्यावर बैठकीत भर देण्यात आला. अनुपस्थित असलेल्या इतर नेत्यांशीही संपर्क साधून त्यांना या भूमिकेसोबत घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

