जिल्हा बँक निवडणुकीत माजी मंत्री शंकरराव गडाख यांची बिनविरोध निवड; नेवासा सोसायटी मतदारसंघातून गडाखांचा एकमेव अर्ज

आपला जिल्हा

जनशक्ती (वृत्तसेवा)- अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी, सोमवारी (ता.५) नेवासा तालुका विविध कार्यकारी सेवा सोसायटी मतदारसंघातून माजी मंत्री शंकरराव गडाख यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. नेवासा तालुक्यातील सुमारे १३० सेवा सोसायटी मतदार असलेल्या या मतदारसंघाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. जिल्ह्यातील अन्य तालुक्यांमध्ये सेवा सोसायटी मतदारसंघातून उमेदवारीसाठी मोठी रस्सीखेच सुरू असताना नेवासा तालुक्यात मात्र माजी मंत्री शंकरराव गडाख यांचा एकमेव अर्ज राहिल्याने सहकार क्षेत्रातील ही निवडणूक विशेष चर्चेचा विषय ठरली आहे.
शंकरराव गडाख हे सहकार क्षेत्रातील अभ्यासु नेतृत्व असून, यापूर्वी जिल्हा सहकारी बँकेच्या चेअरमनपदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली आहे. सन २००७ मध्ये त्यांच्या कार्यकाळात महिला बचत गटांना 4 टक्के व्याजदराने कर्जपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. महिला बचत गटांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला गेला होता. नेवासा तालुक्यातील सहकार क्षेत्रात गडाख यांची असलेली राजकीय व सामाजिक ताकद या उमेदवारीतून पुन्हा एकदा अधोरेखित झाल्याची चर्चा तालुक्यासह जिल्हाभरात सुरू आहे.