पाथर्डी (प्रतिनिधी)- ‘अयि गिरिनंदिनी नंदितमेदिनी…’ या महिषासुरमर्दिनी स्तोत्राच्या जयघोषात श्री क्षेत्र मोहटादेवी गडावर शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त अष्टमीच्या होमहवनाची पूर्णाहुती उत्साहात पार पडली. देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा धर्मादाय उपायुक्त नवनाथ जगताप व त्यांच्या पत्नी सुजाता जगताप यांच्या हस्ते विधिवत होमहवन, कुमारिका पूजन आणि आरती करण्यात आली.
वेदमंत्रांचा घोष, पारंपरिक वाद्यांचा निनाद आणि भक्तिमय वातावरणामुळे संपूर्ण देवस्थान परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
सोमवारी अष्टमीच्या दिवशी मोहटादेवी देवस्थानात श्री गणेशपूजन, पुण्याहवाचन, मातृकापूजन, वास्तुपुरुष, योगिनी, क्षेत्रपाल भैरव, ब्रह्मादी देवता, नवग्रह, रुद्र आणि अग्निदेवतेचे विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर श्री सप्तशती पाठ व वेदमंत्रांच्या उच्चारात होमहवन पार पडले. महानैवेद्य समर्पण करून पूर्णाहुती व आरतीने धार्मिक विधींची सांगता करण्यात आली. 
हिंदू धर्मपरंपरेत कुमारिका आणि सुवासिनी यांना आदिशक्तीचे स्वरूप मानले जाते. या श्रद्धेतून कुमारिका पूजन करण्यात आले. सुवासिनींची ओटी भरण्यात आली, तर कुमारिकांना शालेय साहित्याचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपण्यात आली. होमहवनाच्या निमित्ताने सर्वांना दीर्घायुष्य व उत्तम आरोग्य लाभावे, भारतराष्ट्र समृद्ध आणि आत्मनिर्भर व्हावे, असा महासंकल्प करून श्री मोहटादेवीच्या चरणी प्रार्थना करण्यात आली.
नारायण सुलाखे, सुहास रामदासी, महेश झेंड, भास्कर देशपांडे, बाळासाहेब शिरसागर, भगवान जोशी, गजानन साकरे, भूषण साकरे आणि विशाल पाटेगावकर, नागेश घायाळ यांनी वेदमंत्रोपचारात होमहवनाचे धार्मिक विधी पार पाडले. संभळ व ढोलकीवादक काशीनाथ पवार यांच्या पारंपरिक वादनाने कार्यक्रमाला विशेष रंगत आली.
होमहवनासाठी राज्याच्या विविध भागांतून आलेल्या भाविकांनी मोहटादेवीचे दर्शन घेत होमात नारळ अर्पण केला. यावेळी देवस्थानचे विश्वस्त शुभम दहीफळे, अशोक दहीफळे, शशिकांत दहीफळे, राजेंद्र शिंदे, अॅड. प्रसन्न दराडे, अॅड. कल्याण बडे, विक्रम वाडेकर, बाबासाहेब लाहोटी, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे, जनसंपर्क अधिकारी भीमराव खाडे यांच्यासह भाविक उपस्थित होते.

