बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- चैतन्य नागनाथ मंदिर येथे पुरुषोत्तम मासानिमित्त महिला सुसंस्कार अभियान, स्त्री जागृती कीर्तन महोत्सव व महिला अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यास आजपासूम (ता.१९) प्रारंभ होत असून या निमित्ताने विविध धार्मिक, समाजप्रबोधनपर व सांस्कृतिक कार्यक्रम चेि आयोजन करण्यात आले आहे. स्त्रीशक्ती सबलीकरण, महिला सक्षमीकरण, कौटुंबिक एकात्मता, स्वच्छता, हुंडाबळी प्रतिबंध, स्त्री भ्रूणहत्या निर्मूलन तसेच व्यसनमुक्ती यांसारख्या सामाजिक विषयांवर जनजागृती करण्याच्या उद्देशाने या सप्ताह सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सप्ताह आयोजक महाराष्ट्र प्रबोधन कीर्तनकार जयाताई महाराज घाडगे यांनी दिली. हा कीर्तन महोत्सव नवनाथ महाराज घाडगे, श्रीधर महाराज घाडगे, अमोल महाराज घाडगे, महेश महाराज घाडगे व धनुर्धर महाराज घाडगे यांच्या प्रेरणेने तसेच जयाताई महाराज घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत आहे.
सप्ताहादरम्यान दररोज काकडा भजन, विष्णुसहस्रनाम, गीतापाठ, संगीत भजन, श्रीमद् भागवत कथा, हरिपाठ तसेच रात्री ८ वाजता कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी २ ते ५ या वेळेत भागवताचार्य जयाताई महाराज घाडगे यांच्या अमृतवाणीतून श्रीमद् भागवत कथा होणार आहे. या सप्ताहात मंगळवार दि. १९ रोजी मीनाताई महाराज मडके, बुधवार दि. २० रोजी वाणीभूषण सोनालीताई महाराज फडके, गुरुवार दि. २१ रोजी योगिता महाराज हजारे, शुक्रबार f. २२ रोजी प्रणालीताई महाराज गाडेकर, शनिवार दि. २३ रोजी स्वामी अमृतानंद सरस्वती माताजी तसेच रविवार दि. २४ रोजी शारदाताई महाराज सूर्यवंशी यांची कीर्तने होणार आहेत. विशेष म्हणजे या सप्ताहात मृदुंगाचार्य व गायनाचार्य म्हणूनही महिलांचाच सहभाग असणार आहे. यामध्ये अश्विनीताई मत्सागर (नाशिक), हर्षदाताई महाराज आळंदीकर, गानकोकिळा योगिताताई महाराज हजारे, संगीतविशारद तृप्तीताई महाराज पवार (आळंदी) तसेच मंगलताई महाराज फरकांडे (सिल्लोड) यांचा समावेश आहे. संतपूजन तसेच सकाळ-संध्याकाळ अन्नदानाची सेवाही महिला भगिनींकडूनच पार पडणार आहे.
या सप्ताह सोहळ्याची सांगता मंगळवार दि. २६ रोजी सकाळी ९ वाजता भागवताचार्य ताई महाराज घाडगे यांच्या काल्याच्या कीर्तनाने होणार असून त्यानंतर गावातील महिला भगिनींकडून उपस्थित भाविकांना पुरणपोळीचा महाप्रसाद देण्यात येणार आहे.
या महिला सुसंस्कार अभियान, स्त्री जागृती कीर्तन महोत्सव व महिला अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महिला भजनी मंडळ, महिला बचत गट व ग्रामस्थांनी केले आहे.

