जनशक्ती (वृत्तसेवा)- आज शनी अमावस्या आणि शनी जयंतीचा दुर्मिळ योग एकत्र आल्याने श्री क्षेत्र शनी शिंगणापूर येथे पहाटेपासूनच भक्तांचा अभूतपूर्व महापूर उसळला. राज्यासह परराज्यांतून आलेल्या लाखो भाविकांनी शनिदर्शनासाठी मोठी गर्दी केली असून दिवसभरात सुमारे सहा ते सात लाख भाविकांनी शनिदर्शनासाठी हजेरी लावल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. “ओम नीलांजन समाभासं रविपुत्रम यमाग्रजम…” या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता.
शनी अमावस्येची तिथी पहाटे साधारण ५.११ वाजता सुरू झाली असून ती रविवारी पहाटे १.३१ वाजेपर्यंत राहणार आहे. त्यामुळे शुक्रवार रात्रीपासूनच भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी सुरू झाली होती.
अहिल्यानगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर घोडेगाव येथे सकाळी सात वाजल्यापासून वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या. घोडेगाव शनी चौकात वाहने थेट चौकातच उभी राहत असल्याने वाहनांना डावीकडे-उजवीकडे वळणे कठीण झाले आणि मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली. काही वाहनचालकांनी गर्दीतून पुढे जाण्यासाठी विरुद्ध दिशेने वाहने चालवल्याने परिस्थिती अधिकच बिकट झाली होती. अहिल्यानगरकडून शनी शिंगणापूरकडे येणाऱ्या भाविकांनी घोडेगाव एमआयडीसीमार्गे झापवाडी-सोनई मार्गाचा वापर करावा, असे आवाहन स्थानिकांकडून करण्यात आले. मात्र त्याबाबत योग्य दिशादर्शक फलक किंवा वाहतूक नियंत्रण नसल्याने भाविकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
गर्दीचा वाढता ताण लक्षात घेता पुणे-संभाजीनगर मार्गावरील वाहने ग्रामीण रुग्णालय परिसरात तसेच शिडीमार्गे येणारी वाहने मुळा साखर कारखाना वाहनतळावर थांबविण्यात आली. त्यामुळे अनेक भाविकांना दोन किलोमीटरहून अधिक अंतर उन्हात पायी चालत जावे लागले. वाहनतळापासून मंदिरापर्यंत नेण्यासाठी ऑटो रिक्षांना परवानगी देण्यात आली होती. यात्रेच्या पार्श्वभूमीवर देवस्थान प्रशासनाने केवळ मुख्य महाद्वारातूनच प्रवेश दिल्याने दर्शनरांग मंदिराबाहेरपर्यंत पोहोचली. पहाटेच्या आरतीपासूनच भाविकांच्या झुंडीच्या झुंडी मंदिरात दाखल होत होत्या. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते पहाटेची आरती संपन्न झाली. दुपारी बारा वाजता शनि जन्मवेळ साधून प्रवरा संगम येथून आणलेल्या पवित्र गंगाजलाने शनिमहाराजांना जलाभिषेक करण्यात आला. पंचामृत स्नान, नीलवस्त्र, सुवर्णालंकार आणि सोन्याचा मुकूट असा विशेष साज मूर्तीला चढविण्यात आला. मध्यान्ह आरतीसाठी हजारो भाविकांनी चौथऱ्याजवळ गर्दी केली होती. मंदिर परिसरात अभिषेक, पूजा-अर्चा आणि तेलाभिषेकासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची रांग लागली होती. उन्हाचा तीव्र तडाखा असतानाही भक्तांच्या उत्साहात कोणतीही कमी दिसून आली नाही. मात्र पार्किंग व्यवस्था दोन किलोमीटर दूर, एकाच गेटमधून प्रवेश, अपुरा बंदोबस्त आणि विस्कळीत वाहतूक व्यवस्थेमुळे भाविकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. दरम्यान, एवढी मोठी यात्रा असूनही वाहतूक कोंडीमुळे स्थानिक व्यावसायिकांनाही अपेक्षित ग्राहक मिळाले नाहीत.

