सौंदाळ्याची हॅटट्रिक; नेवासा तालुक्यात तीनही अभियानात पटकावला प्रथम क्रमांक

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- ग्रामविकास, स्वच्छता आणि सर्वांगीण प्रगतीचा आदर्श ठरलेल्या सौंदाळा गावाने यंदा नेवासा तालुक्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान, संत गाडगेबाबा ग्रामस्वछता अभियान आणि आदिशक्ती पुरस्कार या तिनही अभियानात यश मिळवून हॅटट्रिक साधली आहे. राज्य शासनाच्या तीन प्रतिष्ठित अभियानांमध्ये गावाने प्रथम क्रमांक पटकावला आहे, अशी माहिती लोकनियुक्त सरपंच शरदराव आरगडे यांनी दिली.राज्य शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात सौंदाळा गावाने नेवासा तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला. तसेच संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात उत्कृष्ट स्वच्छता, लोकसहभाग आणि पर्यावरणपूरक उपक्रमांच्या जोरावर तालुक्यात प्रथम स्थान पटकावले. याचबरोबर आदिशक्ती पुरस्कारातही सौंदाळा गावाने नेवासा तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवत सलग तिसरे यश संपादन केले.

या कामगिरीबद्दल ग्रामपंचायतीला एकूण १७ लाख ६० हजार रुपयांची बक्षीस रक्कम मिळणार आहे.  यामध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानासाठी १५ लाख, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानासाठी ६० हजार आणि आदिशक्ती पुरस्कारासाठी २ लाख रुपयांचा समावेश आहे.
एका वर्षात तीन महत्त्वाच्या अभियानांमध्ये प्रथम क्रमांक मिळवणे ही अभिमानास्पद कामगिरी आहे. ग्रामपंचायत, ग्रामस्थ, महिला बचत गट, युवक मंडळे तसेच सर्व नागरिकांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे हे यश शक्य झाले.
सरपंच शरदराव आरगडे म्हणाले, ही संपूर्ण गावासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. हे यश सर्वांच्या एकजुटीच्या प्रयत्नांचे फलित आहे. यापुढेही आदर्श ग्रामविकास, स्वच्छता आणि लोकसहभागाच्या बळावर सौंदाळा गाव प्रगतीची वाटचाल कायम ठेवेल.