बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यभरात नुकतेच व्यसनमुक्ती अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून ओम शांती परिवार आणि तक्षशिला इंग्लिश मीडियम स्कूल, देडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने “व्यसनमुक्त मन: सुंदर जीवन” या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला मुख्य व्याख्यात्या म्हणून ब्रह्मकुमारी प्रीती बहनजी दीदी उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना दीदी म्हणाल्या, “ईश्वराने आपल्याला अत्यंत सुंदर जीवन दिले आहे. तात्पुरत्या सुखासाठी आणि क्षणिक आनंदासाठी व्यसनाच्या अधीन जाऊन या मौल्यवान जीवनाचा नाश करू नये. निरोगी आणि सकारात्मक मन राखल्यास व्यसनापासून सहज दूर राहता येते.” या प्रसंगी प्रीती बहनजी यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना “मी आयुष्यात कोणतेही व्यसन करणार नाही” अशी व्यसनमुक्तीची सामूहिक शपथ दिली.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ.गोसावी यांनी व्यसनामुळे मानवी शरीरावर आणि आरोग्यावर होणाऱ्या घातक दुष्परिणामांची सविस्तर माहिती आपल्या व्याख्यानातून विद्यार्थ्यांना दिली.तसेच कार्यक्रमाला सरोदे माता कुकाणा,व अनिल भोसले उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तक्षशिला विद्यालयाचे प्राचार्य विठ्ठल कदम होते. अध्यक्षीय भाषणात बोलताना प्राचार्य कदम म्हणाले, “शाळेपासून ५०० मीटरच्या अंतरात कोणत्याही व्यसनजन्य किंवा तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्यास शासनाने कायदेशीर बंदी घातलेली आहे. देडगाव परिसरातील नागरिक या नियमाचे काटेकोरपणे पालन करतात. आमच्या शालेय परिसरात कुठेही अशा पदार्थांची विक्री होत नाही, याचे सर्व श्रेय देडगावचे सरपंच चंद्रकांत मुंगसे यांना जाते.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपप्राचार्य मयुरी पवार यांनी केले, तर उपप्राचार्य संदीप खाटीक यांनी उपस्थितांचे स्वागत केले. ज्येष्ठ शिक्षिका ज्योती मुंगसे यांनी उपस्थित आमचे आभार मानले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

